लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा
By हरी मोकाशे | Published: March 28, 2024 07:05 PM2024-03-28T19:05:12+5:302024-03-28T19:05:17+5:30
तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे.
लातूर : फाल्गुन महिन्यातच रविराजा रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित पाच प्रकल्पांमध्ये ८.६१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. परतीचाही पाऊस झाला नाही. परिणामी, मांजरा, तेरणा, रेणा, तिरुसह जिल्ह्यातील अन्य नद्या वाहिल्या नाहीत. परिणामी, या नद्यांवर असलेल्या मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाई जाणवू लागली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करुन त्यास मंजुरीही दिली.
सध्या फाल्गून महिना असला तरी उन्हाचे चटके अधिक प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. शिवाय, बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात घट होत आहे.
पाच मध्यम प्रकल्पात १० दलघमी पाणी...
प्रकल्प - उपयुक्त साठा (दलघमी)
तावरजा - जोखा
व्हटी - जोखा
रेणापूर - १.७९५
तिरु - जोखा
देवर्जन - १.१५९
साकोळ - १.६५०
घरणी - २.५७७
मसलगा - ३.३३६
एकूण - १०.५१७
लघु प्रकल्पांमध्ये १०.५१ टक्के साठा...
जिल्ह्यात लघु प्रकल्प एकूण १३४ आहेत. या प्रकल्पांमध्येही पावसाळ्यात पुरेसा जलसाठा झाला नव्हता. दरम्यान, या प्रकल्पातील पाण्याचा शेती, पशुधनासाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या ३३.०१८ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची टक्केवारी १०.५१ अशी आहे.
सर्वाधिक पाणी मसलगा प्रकल्पात...
जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तीन मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा हा जानेवारीमध्येच जोत्याखाली गेला आहे. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पात ८.६१ टक्के साठा आहे. त्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा असून तो २४.५३ टक्के आहे. रेणापूर प्रकल्पात ८.७३, देवर्जनमध्ये १०.८५, साकोळ - १५.०७ आणि घरणी मध्यम प्रकल्पात ११.४७ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके...
जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होऊ नये म्हणून पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले आहे.