लातूरकरांनी अनुभवला अनोखा पोळा, सर्वधर्मीयांनी रस्त्यावर जन्मलेल्या वासरासाठी कापला केक
By संदीप शिंदे | Published: August 26, 2022 06:58 PM2022-08-26T18:58:11+5:302022-08-26T18:58:32+5:30
सर्वधर्मीय बांधवांनी साजरा केला पोळा, सामाजिक कार्यकर्त्या शेख तब्बसुम यांचा पुढाकार
लातूर : शहरातील बौद्धनगर, ताजोद्दीन बाबारोड आणि उबाडे गल्लीतील सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येऊन बैलपोळ्याचा मोठा सण शुक्रवारी आनंदात साजरा केला. प्रभाग ७ मधील प्रदीप गायकवाड, ज्ञानोबा घोडके यांच्या सहकार्याने आणि सामाजिक कार्यकर्त्या शेख तब्बसुम यांच्या पुढाकाराने लातूरकरांनी एक आगळावेगळा पोळा अनुभवला.
रस्त्यावरील पशुंचे अनेकदा हाल होतात. अशीच एक गाय ९ ऑगस्ट रोजी अडलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होती. ही माहिती तब्बसुम शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी काही जणांसमवेत धाव घेतली. मात्र, गाय वाचू शकली नाही. तत्पुर्वी तिने एका गोंडस वासराला जन्म दिला होता. सर्वांनी मिळून गायीचा हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी केला. दरम्यान, वासराचा तब्बसुम यांनी सांभाळ केला.
केक कापून पोळा...
बैलपोळ्यादिवशी रस्त्यावर जन्मलेल्या वासराचे नंदू असे नामकरण करण्यात आले. केक आणून सर्वधर्मीय बांधव मोठ्या उत्साहात सोहळ्यात सहभागी झाले. वासराची काळजी घेऊन सर्वांनीच पोळ्याचा आनंदक्षण द्विगुणीत केला.