मोहालीत लातूरच्या आकाशची ‘सुवर्ण’झेप; अखिल भारतीय स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 06:59 PM2024-01-27T18:59:09+5:302024-01-27T19:00:07+5:30
मोहाली येथील चंडीगड विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आकाशने ही सुवर्णकिमया साधली आहे.
- महेश पाळणे
लातूर : तगड्या स्नॅच व क्लिन अँड जर्कच्या जोरावर लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंडने मोहालीत सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २४० किलो वजन उचलत सुवर्णझेप मारली आहे. आकाशने सलग दुसऱ्या वर्षी अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून लातूरचे नाव भारताच्या नकाशावर कोरले आहे.
मोहाली येथील चंडीगड विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आकाशने ही सुवर्णकिमया साधली आहे. १३२ किलो क्लीन अँड जर्क व १०८ किलो स्नॅच मारत आकाशने तब्बल २४० किलो वजन उचलत भारतातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. दयानंद कला महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आकाशची घरची परिस्थिती बेताची; मात्र याला छेद देत त्याने अनेक वेळा लातूरला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. क्रीडा विभागानेही याची दखल घेत, त्याला काही दिवसांपूर्वीच खुराकासाठी एक लाखाची मदत केली होती. मोहालीच्या गुलाबी थंडीत सुवर्णपदकावर निशाणा साधत त्याने गोल्डन कामगिरी केली आहे.
सलग दोनवेळा सुवर्णयोग...
गतवर्षी आकाशने २३५ किलो वजन उचलत याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. यंदाच्या वर्षातही त्याने ४० स्पर्धकांत प्रथम येऊन दुसऱ्यांदा हा बहुमान पटकाविला आहे. स्पर्धेत त्याने एकतर्फी वर्चस्व गाजविले असून, सिल्व्हर व ब्राँझपदक विजेता वेटलिफ्टर त्याच्यापेक्षा १५ ते १६ किलोने मागे आहे. त्याला प्रशिक्षक नीलेश जाधव, प्रा. अशोक वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.
वेस्ट झोनचा बेस्ट लिफ्टर...
नुकत्याच आंध्र प्रदेश येथे झालेल्या साउथ वेस्ट आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याला बेस्ट लिफ्टरचे अवॉर्ड मिळाले होते; तसेच अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले होते. यांसह अनेक स्पर्धांमध्ये त्याने पदकांची लयलूट केली आहे.
कामगिरीचा वाढता आलेख...
केवळ स्पर्धेत पदके पटकाविणेच आकाशचे लक्ष्य नसून, कामगिरीत सुधारणा करण्याचाही तो सातत्याने प्रयत्न करीत आहे. गतवर्षी झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेत त्याने एकूण २३५ किलो वजन पेलले होते. यात पाच किलोंनी सुधारणा होऊन त्याने यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासह २४० किलो वजन उचलत कामगिरीचा आलेख उंचावला आहे.
नॅशनल गेमची तयारी...
दुसऱ्यांदा अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचा आनंद आहे. मात्र याहूनही उत्तम कामगिरी मला करावयाची आहे. सप्टेंबर महिन्यात उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल गेमची तयारी करणार असून, यातही सुवर्णपदक पटकाविण्याचे लक्ष्य असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आकाशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.