लातूरची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अपडेट ! सहा पथकातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण
By हणमंत गायकवाड | Published: July 26, 2023 03:32 PM2023-07-26T15:32:53+5:302023-07-26T15:33:17+5:30
अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही; तरीपण आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.
लातूर : गतवर्षी पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदा लातूरची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अपडेट करण्यात आली आहे. बचाव आणि शोध कार्यासाठी एकूण सहा पथके असून, त्यातील सर्व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सिंधुदुर्ग येथे यातील किमान दहा जणांना बचाव कार्याचे नव्याने प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
औराद शहाजनी, हलगरा या महसूल मंडळांत पाऊस झाला असला तरी गतवर्षीसारखी परिस्थिती नाही. अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही; तरीपण आपत्ती निवारण यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. लातूर शहरात तीन आणि जिल्ह्यात तीन, अशी एकूण सहा पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. पोलिस मुख्यालयात एक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन, तसेच उदगीर, अहमदपूर आणि निलंगा तालुक्यासाठी प्रत्येकी एक पथक आहे.
बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव कार्यासाठी लागणारे सगळे साहित्य तयार केले आहे. बोटी, लाइफ जाकीट, लाइफ रिंग, इमर्जन्सी लाइट, सर्च लाउट, वूड कटर, काँक्रीट कटर, सेफ्ट नेट, अत्यावश्यक शिड्या, रेस्क्यू रोप आदी साहित्य सज्ज ठेवले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात पालिकेची यंत्रणा
पाऊस झाल्यामुळे नाल्या अडून घरामध्ये पाणी शिरण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. तशी परिस्थिती उद्भवली तर त्याला सामोरे जाण्यासाठीही महानगरपालिकेच्या यंत्रणेला सज्ज करण्यात आले आहे. नाल्या तुंबून पाणी अडणार नाही या अनुषंगानेही सकल भागामध्ये दक्षता बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय करण्यात आला आहे.
जीर्ण इमारतींबाबत संबंधित मालमत्ताधारकांना सूचना
गाव भागामध्ये १५ ते २० जीर्ण इमारती परिसरात वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्यांना इमारती पाण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. इमारत कोसळण्याची शक्यता असलेल्या इमारती न पडल्यास महानगरपालिका या अनुषंगाने कारवाई करणार आहे.
यंत्रणा सक्षम
प्रत्येक पथकात आठ ते दहा कर्मचारी आहेत. त्यांना बचाव कार्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंत्रणा सक्षम केली आहे. कोणत्याही क्षणी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
- साकेत उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी