फुटबॉलपटू 'स्वराज'ने साधला यशाचा 'गोल'; जर्मनीत प्रशिक्षणासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:33 PM2023-03-13T20:33:16+5:302023-03-13T20:35:56+5:30

इयत्ता आठवीत असलेल्या स्वराजला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड असून, त्याने बालवयातच उत्तम कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले.

Latur's football player Swaraj Sawant's success; Selected for football training in Germany | फुटबॉलपटू 'स्वराज'ने साधला यशाचा 'गोल'; जर्मनीत प्रशिक्षणासाठी निवड

फुटबॉलपटू 'स्वराज'ने साधला यशाचा 'गोल'; जर्मनीत प्रशिक्षणासाठी निवड

googlenewsNext

- महेश पाळणे

लातूर : उत्कृष्ट ड्रिबलिंगचे कौशल्य व शारीरिक क्षमतेच्या जोरावर लातूरच्या स्वराज महेश सावंतने एफसी बायर्न कप फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळी करीत आपल्या संघाला विजय तर मिळवून दिलाच सोबतच जर्मनी येथे होणाऱ्या फुटबॉल प्रशिक्षणासाठी आपली निवड पक्की केली आहे.

बाल फुटबॉलपटूंना उच्च प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाने जर्मनी येथील बायर्न म्युनिक या अग्रगण्य फुटबॉल क्लबशी करार केला आहे. त्यानुसार १४ वर्षांखालील खेळाडूंना जर्मनीत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत एफसी बायर्न कप फुटबॉल स्पर्धेचे जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून उत्तम अशा २० खेळाडूंना जर्मनी येथे येत्या काही दिवसांत प्रशिक्षण मिळणार आहे. लातूर येथील स्वराज सावंतने पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधनीचे प्रतिनिधित्व करीत छाप सोडली. त्याने या स्पर्धेत क्रीडा प्रबोधनीचे प्रतिनिधित्व करीत अनेक गोल नोंदविले. यासह आपल्या संघास विजेतेपदही मिळवून दिले. उपांत्यपूर्व सामन्यात अमरावतीचा, उपांत्य सामन्यात कोल्हापूरचा तर अंतिम सामन्यांत मुंबईचा पराभव करीत आपल्या संघास विजेतेपद मिळवून दिले.

इयत्ता आठवीत असलेल्या स्वराजला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड असून, त्याने बालवयातच उत्तम कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले. एकंदरीत या कामगिरीमुळे त्याची जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, भविष्यात उत्तम फुटबॉलपटू होण्याचा मार्ग त्याला मिळाला आहे. त्यास प्रशिक्षक धीरज मिश्रा, सहायक प्रशिक्षक शिवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या यशाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

स्वराज मराठवाड्याचा एकमेव खेळाडू...

जर्मनी येथील प्रशिक्षणासाठी निवड झालेला स्वराज मराठवाड्यातील एकमेव खेळाडू असून, त्याने एफसी बायर्न फुटबॉल स्पर्धेत उत्तम मिडफिल्डर असल्याचे सिद्ध केले आहे. जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत जवळपास ५० हजार खेळाडू खेळले असले तरी यातील उत्कृष्ट अशा २० खेळाडूंनाच जर्मनी येथे प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या २० मधील स्वराज तिसरा खेळाडू ठरला आहे.

दाखविले उत्तम ड्रिबलिंगचे कौशल्य...
स्वराजने बायर्न क्लब फुटबॉल स्पर्धेत उत्तम ड्रिबलिंगचे कौशल्य दाखविले असून, विरोधी खेळाडूंना चकमा देत त्याने आपल्या संघाला गोल करून आघाडी मिळवून दिली. यासह फाॅरवर्ड खेळाडूंनाही त्याने उत्तम पास देत कौशल्याची चुणूक दाखविली.

Web Title: Latur's football player Swaraj Sawant's success; Selected for football training in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.