जिम्नॅस्टिकमध्ये लातूरच्या सुषमाचा करिष्मा; एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 06:23 PM2023-08-10T18:23:34+5:302023-08-10T18:24:15+5:30
एरोबिक्स जिम्नॅस्टिकमधील एरो डान्स प्रकारात तिने आता हातखंडा मिळविला आहे.
- महेश पाळणे
लातूर : शरीराची फ्लेक्झिबिलिटी, स्ट्रेंथ व उत्कृष्ट एलिमेंट्सच्या जोरावर जिम्नॅस्टिक खेळात गुणांची कमाई करणाऱ्या लातूरच्या सुषमा भाऊराव शिंदेने या खेळात करिष्मा केला असून, मंगोलिया येथे होणाऱ्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे. या खेळात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातून तिची निवड झाली असून, ती या खेळातील पहिलीच आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे.
लातूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी सुषमा शिंदेला लहानपणापासूनच खेळाची आवड. योगा व मल्लखांबच्या माध्यमातून तिने खेळाला सुरुवात केली. त्यानंतर तिचे पाऊल जिम्नॅस्टिक खेळाकडे वळले. एरोबिक्स जिम्नॅस्टिकमधील एरो डान्स प्रकारात तिने आता हातखंडा मिळविला आहे. त्यामुळे तिची वरिष्ठ भारतीय संघात निवड झाली आहे.
जिद्द व नियमितता आली कामी...
रुद्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून तिने या खेळात लय साधत ही किमया साधली आहे. खेळाप्रती असलेली जिद्द, नियमितता या माध्यमातूनच तिने हे यश मिळविले आहे. सध्या बीपीएडचे शिक्षण घेणाऱ्या सुषमाने या खेळात लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. तिला प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेते मकरंद जोशी, जिल्हा सचिव आशा झुंजे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे ॲड. महादेव झुंजे-पाटील, संजय भुसनुरे, मोहन झुंजे-पाटील, प्रियंका सगरे यांनी कौतुक केले.
विद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धेतही छाप...
आजतागायत तिने तीन राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, दोनवेळा आंतर विद्यापीठ स्पर्धेतही प्रतिनिधित्व केले आहे. सात वेळा राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवून तिने विविध पदके मिळविली आहेत. मिक्सपेअर श्रेणी व एरो डान्समध्ये तिने अनेक वेळा रौप्य व कांस्यपदक पटकाविले आहे. २०१९ साली तिची आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र काही कारणास्तव तिला जाता आले नाही. भारतीय संघाची निवड चाचणी छत्रपती संभाजीनगर येथे झाली होती. यातूनच तिची निवड झाली असून, एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान मंगोलिया येथे होणार आहे. यासाठीचे सराव शिबिरही छत्रपती संभाजीनगरात सुरू आहे.
कठोर परिश्रमाचे फळ...
भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद झाला. यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले असल्याचे तिने सांगितले. सरावातील सातत्य व प्रशिक्षकांनी दिलेले उत्तम प्रशिक्षण याचेच हे फलित असल्याचे सुषमा शिंदेने ‘लोकमत’ला सांगितले.