राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी गाजविले मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:24 AM2021-08-13T04:24:03+5:302021-08-13T04:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मैदानी प्रकारातील रनिंग, जम्पिंग, थ्रोईंग या तिन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी करीत लातूरच्या खेळाडूंनी गोवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मैदानी प्रकारातील रनिंग, जम्पिंग, थ्रोईंग या तिन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी करीत लातूरच्या खेळाडूंनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या सहाव्या नॅशनल गेम स्पर्धेत छाप सोडली. पाच सुवर्ण पदकांसह एक रौप्य पदक पटकावीत सहा पदकांची लूट करीत मैदानी क्रीडा प्रकारात मैदान गाजविले.
यूथ स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने गोवा येथे सहाव्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. यात लातूरच्या सहा खेळाडूंनी प्राविण्य प्राप्त केले. सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात बारा वर्षांखालील मुलांच्या गटात कैवल्य शेट्टे याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले. १४ वर्षांखालील गटात लांब उडी प्रकारात विरेश चौधरीने प्रथम स्थान पटकाविले. याच गटात गौरंग पवळेने प्रथम स्थापन पटकावीत सुवर्ण मिळविले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात उंच उडी क्रीडा प्रकारात केशव काकडेने सुवर्णपदक मिळविले. याच गटातील चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत आदित्य नागरगोजेने रौप्य पदक मिळविले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटातील भालाफेकीत राधा गोरेने ३८.५० मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकाविले. या खेळाडूंना मैदानी प्रशिक्षक समाधान बुरगे, शैलेश पाडुळे, दिनकर क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे कौतुक जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडाधिकारी लता गुप्ता, मीरा रायबान, क्रीडाधिकारी मदन गायकवाड, कृष्णा केंद्रे, विजयकांत नाईकवाडे, जयराज मुंडे, चंद्रकांत लोदगेकर, सुरेंद्र कराड यांनी केले आहे.
हिटपासूनच टॉपवर...
या राष्ट्रीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी सुरेख कामगिरी करीत यश मिळविले. सुरुवातीच्या दोन हिटमध्ये लातूरचे खेळाडू टॉपवर होते. यासह उपान्त्य फेरीसह अंतिम फेरीतही तीच लय कायम राखत पदकांची लयलूट केली. अनेक दिवसानंतर मैदानी क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी असे एकत्रित येत यश मिळविले आहे.
तुल्यबळ खेळाडूंचा केला पराभव...
स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व दिल्लीच्या खेळाडूंचा पराभव करीत पाच सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावीत सहा पदकांची कमाई केली.