कॉमनवेल्थ तलवारबाजीत लातूरच्या साईप्रसादची चमक; न्यूझिलँड येथील स्पर्धेत सांघिक कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:59 IST2024-07-15T17:58:50+5:302024-07-15T17:59:37+5:30
छत्रपती संभाजीनगर येथे साई केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईप्रसादने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

कॉमनवेल्थ तलवारबाजीत लातूरच्या साईप्रसादची चमक; न्यूझिलँड येथील स्पर्धेत सांघिक कांस्य
- महेश पाळणे
लातूर : तलवारबाजीतील आक्रमक कौशल्य तसेच उत्कृष्ट डिफेन्सच्या जोरावर लातूरच्या साईप्रसाद संग्राम जंगवाडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. न्यूझिलँड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी स्पर्धेत सांघिक कांस्यपदक पटकावीत लातूरचे नाव रोशन केले आहे. अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात शिकणाऱ्या साईप्रसाद जंगवाडने १७ वर्षांखालील वयोगटात इप्पी प्रकारात हे यश मिळविले आहे. चार जणांच्या असणाऱ्या या संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू म्हणून साईप्रसादची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत साईप्रसादने हे यश मिळविले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे साई केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या साईप्रसादने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. यापूर्वीही साईप्रसादने आपल्या कामगिरीच्या जोरावर तलवारबाजी खेळात अनेकवेळा यश संपादन केले आहे. त्यास प्रशिक्षक वजिरोद्दीन काझी, आकाश बनसोडे, मोहसीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते दत्ता गलाले, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. अभिजीत मोरे यांनी कौतुक केले आहे.
वैयक्तिक प्रकारात पाचवा...
सांघिक प्रकारात साईप्रसादने भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले असून, वैयक्तिक प्रकारात तो या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहिला. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनंतर त्याने वैयक्तिक प्रकारात पाचवे स्थान पटकाविले आहे. नियमित पाच तास सराव करणाऱ्या साईप्रसादने हे यश मिळविले आहे.
राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतही दबदबा...
यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत साईप्रसादने तलवारबाजीत आपली धार दाखवून दिली आहे. बहरीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेटस् स्पर्धेत त्याने सहभाग नोंदविला होता. यासह चार राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा सुवर्ण तर एकवेळा रौप्यपदक पटकाविले आहे. यासह राज्य स्पर्धेत त्याने ६ वेळेस सुवर्ण तर १० वेळेस कांस्यपद पटकाविले आहे. त्याच्या या यशाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. आजतागायत त्याने राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत ४० वेळा विविध पदके पटकाविली आहेत.