लातूरच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहल, हवाई सफरीसाठी गुरुजींचीही आता लेखी परीक्षा
By हरी मोकाशे | Published: March 18, 2023 05:35 PM2023-03-18T17:35:08+5:302023-03-18T17:36:03+5:30
इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
लातूर : बंगळुरूतील भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळपाहणी, अभ्यास आणि हवाई सफरीसाठी जिल्ह्यातील इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढे पेच निर्माण झाला होता. त्यावर मार्ग काढत शिक्षण विभागाने इच्छुक शिक्षकांसाठी सोमवारी लेखी परीक्षेची कसोटी लावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपाठोपाठ गुरुजींनाही आता परीक्षा द्यावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांतील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून विभागीय आयुक्तांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक संस्थांना भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३२ हजार ९४० विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा झाली. गुणवत्तेनुसार त्यांतील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, या विद्यार्थ्यांसोबत विज्ञानाचे ५ शिक्षक असणार आहेत. या सफरीमध्ये आपली वर्णी लागावी म्हणून या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे शिक्षण विभागापुढे मोठी समस्या निर्माण झाली. अखेर या शिक्षकांची बैठक घेण्यात येऊन लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या शिक्षकांनी होकार दर्शविला.
शंभर गुणांची होणार परीक्षा
इस्रो भेटीसाठी ३० शाळांतील इच्छुक शिक्षकांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात ७५ गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील; तर २५ गुणांचा एक निबंध असेल. हा निबंध विज्ञान विषयाशी निगडित राहणार आहे. एकूण शंभर गुणांची परीक्षा होणार आहे.
उत्तर चुकल्यास वजा हाेणार गुण
दोन तासांची ही परीक्षा सोमवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत लातुरातील केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेत उत्तर चुकल्यास गुण वजा केले जाणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गुणांवर होणार निवड
इस्रो भेटीसाठी इच्छुक शिक्षकांची संख्या वाढली. त्यामुळे निवड कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला; कारण, आम्ही निवडलेल्या शिक्षकांवर आक्षेप येऊन वाद होऊ नयेत म्हणून अखेर लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शिक्षकांची सहलीसाठी निवड केली जाणार आहे.
- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
आमचाही वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल
सहजासहजी इस्रोला जाऊन तेथील पाहणी करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या पाहणीतून आमचाही वैज्ञानिक दृष्टिकोन आणखी वाढेल आणि त्याचा शाळेत अध्यापन करताना आणखी लाभ होईल.
- परीक्षार्थी शिक्षक