लातूरचा भुयारी मार्ग बनला अपघात मार्ग; भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

By राजकुमार जोंधळे | Published: March 8, 2023 07:28 PM2023-03-08T19:28:50+5:302023-03-08T19:29:05+5:30

लातुरातील उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गातील थरार...

Latur's subway became an accident route; The speeding vehicle crushed the bike rider | लातूरचा भुयारी मार्ग बनला अपघात मार्ग; भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

लातूरचा भुयारी मार्ग बनला अपघात मार्ग; भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

googlenewsNext

लातूर : शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका ४६ वर्षीय दुचकीचालकाला भरधाव अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी घडली. हा थरार रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागल्याने दुचाकीचालक ठार झाला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, किशोर अरविंद कुलकर्णी (वय ४६) हे मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास महात्मा गांधी चौक येथून बार्शी रोडकडे दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, दुचाकी उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गावरुन जाताना उतारावर पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. हा थरार एवढा भयानक होता, की जाणाऱ्या इतर वाहनधारकांचे मन सुन्न झाले. या अपघातात किशोर कुलकर्णी यांच्या डोक्याला उजव्या बाजूला जबर मार लागला. अपघाताची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याला मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमी किशोर कुलकर्णी यांना एका ऑटोमधून शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत डॉक्टरच्या माहितीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी बुधवारी दिली. तपास पोहेकॉ. गुरुनाथ भताने करत आहेत.

'त्या' अज्ञात चारचाकी वाहनधारकाने ठोकली धूम...
दुचाकीचालकाला चिरडल्यानंतर घटनास्थळी चारचाकीच्या चालकाने न थांबता तो पसार झाला. त्याने एवढ्या जोराने चिरडले की, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भुयारी मार्ग बनला आता अपघात मार्ग...
लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून, दोन्ही बाजूने भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या भुयारी मार्गातून जाताना वाहनाचा वेग अमर्याद होतो. याच भरधावपणातून असे अपघात होत आहेत. सध्याला भुयारी मार्ग हा अपघात मार्ग बनला आहे.

सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून पाहणी...
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही फुटजेची पाहणी पोलिसांनी बुधवारी दिवसभर केली. दुचाकीला चिरडलेल्या वाहनाचा पोलीस तपास करीत आहेत. लवकरच अज्ञात वाहनचालकाला अटक करण्यात येईल, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले.

Web Title: Latur's subway became an accident route; The speeding vehicle crushed the bike rider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.