लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क
By हणमंत गायकवाड | Published: May 9, 2024 06:57 PM2024-05-09T18:57:28+5:302024-05-09T18:57:54+5:30
लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
लातूर : लातूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले असून, १९ लाख ८० हजार ४०९ मतदारांपैकी १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक विभागाने स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले होते. त्याला यश मिळाले असून, ६२.५९ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत ११ लाख ७० हजार ३९८ मतदारांनी मतदान केले होते. त्या तुलनेत यंदा टक्का वाढला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात लोहा विधानसभा मतदारसंघात १ लाख ७९ हजार ७७६, लातूर ग्रामीण २ लाख ११ हजार ७११, लातूर शहर २ लाख ३३ हजार ९३४, अहमदपूर २ लाख १३ हजार ७२६, उदगीर १ लाख ९८ हजार ६२ आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात २ लाख १४६ मतदारांनी मतदान केले आहे. उन्हाची तीव्रता असतानाही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून जनजागृती केली जात होती. १६ हजारांवर कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता. दिव्यांग, सखी, युवा मतदान केंद्रांची संकल्पना राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठीही ३५२ मतदान केंद्रांवर वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. वनौषधीचे महत्त्व देण्यासाठीही वडवळ नागनाथ येथील एका मतदान केंद्राबाहेर स्टॉल लावण्यात आला होता. असे वेगवेगळे उपक्रम राबवून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६२.५९ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले आहे.
५ लाख ७२ हजार ७०० महिलांनी हक्क बजावला
१२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी मतदान केले. त्यात ६ लाख ६४ हजार ६३० पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर ५ लाख ७२ हजार ७०० महिला मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदारांच्या मतांचे प्रमाण अधिक आहे, मागील तीन निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचे दिसत आहे.