महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे
By राजकुमार जोंधळे | Published: February 25, 2023 05:35 PM2023-02-25T17:35:00+5:302023-02-25T17:36:29+5:30
सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली
लातूर : पुण्यातील विधानसभेच्या दाेन मतदारसंघाची पाेटनिवडणूक जाहीर झाली असून, लवकरच मतदान हाेणार आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उर्वरित महाराष्ट्राला वाऱ्यावर साेडून, केवळ निवडणूक प्रचारासाठी आठ दिवसांपासून पुण्यात तळ ठाेकून आहेत, असा आराेप विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी लातुरात पत्रपरिषदेत केला.
राज्यभरात सध्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. विविध गैरसमज परसविले जात आहेत. हे गैरसमज, संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने शिवगर्जना संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी विराेधी पक्षनेते अंबादास दानवे शनिवारी लातूर दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली. शिवाय, सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शाेभाताई बेंजरगे, संताेष साेमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.
नामांतराबाबत संशय वाटताेय...
मराठवाड्यातील औरंगादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, हे नामांतर त्या-त्या शहराचे झाले. मात्र, जिल्ह्याचे नाव केंद्र सरकारने दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद व धाराशिव असेच राहणार काय? याबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला. सरकारचा हेतू दाेन्ही शहरांचे नामांतर करण्याचा नाही, असाही आराेप केला.
जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत...
निवडणूक आयाेगाच्या मदतीने एकनाथ शिंदे गटाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चाेरले आहे, असा आराेप करून दानवे म्हणाले, की चिन्ह आणि नाव चाेरले असले, तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत आहे. चाेरलेल्या नाव आणि चिन्हाचा आमच्यावर काेणताही परिणाम हाेणार नाही, असेही ते म्हणाले.