कुस्ती कलेचा वारसा जपणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 07:52 PM2019-12-31T19:52:33+5:302019-12-31T19:55:45+5:30
सैराटफेम तानाजी गलगुंडे यांच्याशी बातचित
- महेश पाळणे
लातूर : महाराष्ट्राला कुस्तीकलेचा वारसा आहे़ क्रिकेट, कबड्डी प्रमाणे कुस्तीलाही चांगले दिवस आले आहेत़ हा वारसा तरूण मल्लांनी जपला पाहिजे, असे तानाजी गलगुंडेंनी सांगितले़
लातूर तालुक्यातील साई येथे कुस्ती स्पर्धेसाठी सैराट फेम तानाजी गलगुंडे (लंगड्या) आला असता त्याने ‘लोकमत’शी बातचित केली़ यावेळी तो म्हणाला, मलाही लहानपणापासून कुस्तीची आवड होती़ माझे मित्र व मामाचे मुलं कुस्ती खेळत होते़ त्यामुळे मी ही आखाड्यात जायचो़ त्यामुळे माझे कुस्तीवर प्रेम आहे़ दंगल चित्रपटामुळे कुस्ती घराघरात पोहोचली असून, क्रिकेट प्रमाणेच कुस्तीलाही प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे़ त्यामुळे अधिकाधिक खेळाडू कुस्तीकडे आकर्षिले जातील़ अभिनयाविषयी बोलले असता तो म्हणाला, दक्षिणात्य कन्नड चित्रपटात सध्या काम करत असून, कोणत्याही भाषेत चित्रपट करण्याची माझी तयारी आहे़ यासह मराठीतील बिस्कीट व नागराज मंजुळेच्या आगामी झुंड या हिंदी चित्रपटात अभिनय करत असल्याचेही त्याने सांगितले़ शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे़ मनुष्य हा बुद्धीमान माणूस आहे़ त्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर करून क्रीडा क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे़ अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांनी कुस्तीत मोलाचे योगदान दिले आहे़ त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पदक मिळवून देत आहेत़ साई गावात मिळालेल्या प्रेमामुळे भारावून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले़
काजू, बदाम खा़
सैराट चित्रपटात गुटखा खाल्यानंतर आर्चीने रागविल्याचे सांगून तो सीन सिनेमापुरता मर्यादित होता़ मात्र खऱ्या जीवनात युवकांनी व्यसनापासून दूर रहावे़ काजू, बदाम खाऊन आपली शरीरयष्टी कशी बलवान बनेल, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचेही त्याने सांगितले़ व्यसनावरील पैसा व्यर्थ असून, तो खर्च वळवून शरीराकडे द्यावा, असेही तो म्हणाला़
अभिनयातून बरेच शिकायला मिळाले
कन्नड चित्रपटात काम करताना भाषेचा त्रास झाला़ मात्र अभिनय महत्त्वाचा असून, कोणत्याही भाषेत चित्रपट करण्याची तयारी असून, यामुळे बरेच काही शिकायला मिळाले़ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले़