शेजारच्या छतावरून बिबट्याची थेट घरात एंट्री; बिबट्याच्या मुक्त संचाराने उदगीरकरांत भीती
By संदीप शिंदे | Updated: November 29, 2024 18:30 IST2024-11-29T18:29:40+5:302024-11-29T18:30:02+5:30
प्रशासनाच्या वतीने सकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे

शेजारच्या छतावरून बिबट्याची थेट घरात एंट्री; बिबट्याच्या मुक्त संचाराने उदगीरकरांत भीती
उदगीर : शहरातील पारकट्टी गल्लीत शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एकाच्या घरातून बिबट्याचा वावर झाल्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या वतीने सकाळपासून शोधकार्य सुरू करण्यात आले असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन, महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उदगीर येथील पारकट्टी गल्लीत असलेल्या बाळू बागबंदे यांच्या घरात बाजूच्या घराच्या छतावरून बिबट्याने घरात उडी घेतली. घरात असलेल्या बाथरूममध्ये जाऊन पायऱ्यावाटे छतावर जाऊन बिबट्याने रस्त्यावर उडी घेऊन पसार झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शिवाय बाळू बागबंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बागबंदे या सकाळी उठून गच्चीवर थांबल्या असता त्यांच्यासमोरूनच या बिबट्याने दुसऱ्याच्या गच्चीवर उडी घेऊन रस्त्यावर पसार झाल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. घटनास्थळी लातूरच्या सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, तहसीलदार राम बोरगावकर, वन परिमंडळ अधिकारी वर्षा नागरगोजे, वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे, वनरक्षक नामदेव डिगोळे, पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे. उदगीर शहरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस व वन विभागाची पथके शहरात गस्त घालणार आहेत. रात्री बेरात्री शेतात मुक्काम करू नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात बांधावे. बिबट्या आढळून आल्यास त्वरित स्थानिक प्रशासनास कळवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उदगीर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकांत भीतीचे वातावरण. प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू #laturnews#leopardpic.twitter.com/gmzTcSMsdK
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 29, 2024
किल्ला परिसरातून आला असावा...
पारकट्टे गल्लीपासून उदगीरचा ऐतिहासिक किल्ला जवळच असल्यामुळे व किल्ला परिसरात असलेली घनदाट झाडी, झुडपे यामुळे हा बिबट्या किल्ला परिसरातून आला असावा, असा अंदाज वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे यांनी वर्तवला आहे. वन विभागाकडून पथके तयार करण्यात आली असल्याचे केसाळे म्हणाले.