बाभळगावात पालकमंत्र्यांच्या शेताजवळ आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 01:31 PM2020-05-03T13:31:46+5:302020-05-03T13:34:02+5:30
बाभळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावर काही जणांना बिबट्याचे दर्शन घडले
लातूर : लातूर शहराजवळ बाभळगाव येथे रविवारी सकाळी ६.३० च्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतीजवळ बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तीन पिंजरे लावले आहेत.
लातूर-बाभळगाव-भुसनी-निटूर या मार्गावर नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी शेतकऱ्यांची रेलचेल सुरू होती. दरम्यान बाभळगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावर काही जणांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे भीतीपोटी हे नागरिक घराकडे परतले. त्याचवेळी या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. ही माहिती पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शेतातील शेतगड्याने बिबट्या आढळल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अर्ध्या तासाच्या कालावधीत तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांच्यासह २० कर्मचारी दाखल झाले. त्यांनी बिबट्यांच्या माग काढण्यास सुरुवात केली असता, पालकमंत्र्यांच्या ऊस शेतीजवळ एका बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ऊस शेती परिसरात दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. याशिवाय काही अंतरावर असलेल्या बांबूशेती परिसरातही एक पिंजरा लावला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी घाबरू नये...
एका बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही तीन पिंजरे लावले आहेत. तसेच २० कर्मचारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. असे तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांनी सांगितले.
६० एकर परिसरात फिरू नका...
बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. हे ठसे ऊस शेती परिसरातील आहेत. त्यामुळे नागरिकांनी या भागातील ५० ते ६० एकर परिसरात फिरू नये , असे आवाहनही पचरंडे यांनी केले आहे.
दोन वर्षांपूर्वी आढळला होता बिबट्या...
लातूर जिल्ह्यात बिबट्याचे वास्तव्य नाही. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परिसरातून पाणी आणि खाद्याच्या शोधात बिबटे येतात. पावसाळा सुरू होऊ लागला की पुन्हा हे बिबटे डोंगराळ भागाकडे परततात. दोन वर्षांपूर्वी रेणापूर तालुक्यातील खलंग्री परिसरात बिबट्या आढळला होता.
त्रणभक्षी प्राणी हे खाद्य...
बिबट्याचे खाद्य हे त्रणभक्षी प्राणी आहेत. लातूर जिल्ह्यात माळराने अधिक असल्याने हरीण, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर अशा त्रणभक्षी प्राण्यांचे प्रमाण अधिक आहे. बिबट्याचे त्रणभक्षी प्राण्यांवर लक्ष असते. हे प्राणी न मिळाल्यास पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात, असे तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांनी सांगितले.