रेणापूर तालुक्यातील गोढाळा शिवारात बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 06:24 PM2018-08-02T18:24:01+5:302018-08-02T18:24:47+5:30
तालूक्यातील गोढाळा शिवारात बुधवारी रात्री रात्री ११ वाजेच्या सुमारास एका शेतातील घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव कूत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.
रेणापूर ( लातुर ) : तालूक्यातील गोढाळा शिवारात बुधवारी रात्री रात्री ११ वाजेच्या सुमारास एका शेतातील घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे गोढाळा, खलंग्री, सारोळा, व्होटी, सायगाव या गावातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण आहे.
गोढाळा शिवारात शेतकरी धनंजय डोंगरे यांची शेती असुन शेतातच त्यांचे घर आहे. त्यांनी घरासमोर पाळीव कूत्रा बांधला होता. बुधवारी रात्री या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला. डोंगरे यांचे भाऊ राजकुमार डोंयांनी घराच्या छतावरुन हा प्रकार पाहिला. तेव्हा त्यांनी बिबट्यावर दगडाने हल्ला केला. यामुळे बिबट्या कुत्र्याला घेऊन तेथून पळाला.
डोंगरे यांनी याची माहिती गोढाळा येथील ग्रामस्थांना व किनगाव पोलीस स्टेशनला दिली. किनगाव पोलीस गोढाळा शिवारात दाखल झाली. यावेळी शिवारातील शेतकरी सुभाष डिगुळे यांच्या कोठयावरील कुत्र्यावरसुद्धा बिबट्याने हल्ला केल्याचे दिसुन आले.
आज सकाळपासून वन विभागाचे पथक येथे तळ ठोकून आहे. यात वन संरक्षक एस. एल. वाटपवाड, वनपाल एन. बी. घोरपडे, वनमजूर एन.के. चेपट यांच्यासह अन्य कर्मचारी आहेत. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्याची तयारी सुरू केली आहे.