शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांत भीती : सतर्कतेचे आवाहन
By हरी मोकाशे | Updated: May 16, 2024 20:26 IST2024-05-16T20:26:17+5:302024-05-16T20:26:28+5:30
याबाबतचे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केले आहे.

शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांत भीती : सतर्कतेचे आवाहन
लातूर : चाकूर तालुक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये ऊसाचे फड आणि पाणी असल्याने बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तरीही ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केले आहे.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथे गत आठवड्यात म्हशीच्या वासराचा कुठल्या तरी वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागास माहिती दिली. त्याच दिवशी रात्री वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा कुठल्याही वन्य प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या नाहीत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यावरुन वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत.
चार तालुक्यातील कर्मचाऱ्यांची गस्त...
चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड परिसरात ऊसाचे मोठे फड आहेत. त्याचबरोबर पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर झाल्याचे पाऊलखुणावरुन दिसून येत आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच पाच ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर चाकूर, अहमदपूर, जळकोट, उदगीर तालुक्यातील वनरक्षक व वनपालांकडून सातत्याने गस्त सुरु आहे. नागरिकांनी सतर्क रहावे म्हणून दवंडी देण्यात आली आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी शेतात मुक्काम करु नये...
शेतकऱ्यांनी शेतात रात्री मुक्काम करू नये. साथ सलोख्याचे नियम पाळून, चमूने, गटाने शेती कामासाठी जावे. शेतात मोकळ्या जागेत मुक्काम करू नये. लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये. जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. बिबट्या निदर्शनास आल्यास त्याची माहिती वन विभाग, सरपंच, पोलिस पाटीलांना कळवावी.
- वैशाली तांबे, सहायक वनसंरक्षक.