'आम्हाला शिकू द्या, लवकर शिक्षकांची नियुक्ती करा'; विद्यार्थ्यांचा लातूर जिल्हा परिषदेत ठिय्या
By हरी मोकाशे | Published: July 5, 2023 04:25 PM2023-07-05T16:25:18+5:302023-07-05T16:25:54+5:30
शैक्षणिक नुकसान होत असल्याने अंधोरीतील मुले आक्रमक
लातूर : अंधोरी (ता. अहमदपूर) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी, आम्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी बुधवारी थेट जिल्हा परिषद गाठली अन् दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, सीईओंकडे धाव घेऊन आपल्या अडचणी मांडल्या.
अहमदपूर तालुक्यातील अंधाेरी येथे जिल्हा परिषद प्रशाला आहे. प्रशालेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. प्रशालेची पटसंख्या जवळपास २३० आहे. प्रशालेसाठी एकूण १० शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील पाच पदे दाेन वर्षांपासून रिक्त आहेत. प्रशालेतील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामाजिकशास्त्र तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्र विषय शिकविण्यासाठी शिक्षक नाही. तसेच प्राथमिक शिक्षकाचे एक पद रिक्त आहे.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. परिणामी, शाळेची पटसंख्या घटत आहे. काही पालकांनी आपल्या मुलांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र घेऊन अन्य शाळेत प्रवेश घेतला आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत बुधवारी शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सदस्य नमोद कांबळे, गुणवंत बेंबडे, शेषाबाई कावळे, त्रिमुख बने यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
अन् पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखले...
जिल्हा परिषदेचे सीईओ अथवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडण्यासाठी अंधोरीच्या प्रशालेतील विद्यार्थी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी बुधवारी सकाळी वाहनाने जिल्हा परिषदेत आले. ते मुख्य इमारतीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना तिथेच रोखले. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान...
दोन वर्षांपासून प्रशालेतील शिक्षकांची पाच पदे रिक्त आहेत. ती भरण्यात यावीत म्हणून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहोत. परंतु, अद्यापही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याठी विद्यार्थ्यांसह आम्ही हे आंदोलन केले.
- दिनेश सूर्यवंशी, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, अंधोरी.