'आरक्षणास स्थगितीने जीवन अंधकारमय'; ‘एक मराठा - लाख मराठा’ घोषणा देत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:39 PM2020-09-10T17:39:42+5:302020-09-10T17:43:26+5:30
या तरुणाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर जीवन अंधकारमय झाले आहे.
चाकूर (जि. लातूर) : ‘एक मराठा - लाख मराठा’ अशी घोषणा देत चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील एका तरुणाने तहसील कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदारांनी स्वत:च्या वाहनाने तरुणाला रुग्णालयात नेले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अंमलबजावणी संदर्भात दिलेला स्थगितीचा निर्णय ऐकल्यानंतर अस्वस्थ झालेल्या बोरगाव येथील किशोर गिरीधर कदम (२५) या तरुणाने गुरुवारी चाकूरचे तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा आवाज ऐकूण तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे कार्यालयाबाहेर आले. तोपर्यंत या तरुणाने काही प्रमाणात विष प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे तहसीलदार डॉ. बिडवे यांनी तात्काळ त्यांच्या वाहनातून सदर तरुणास चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले.
तेथे उपस्थित असलेले डॉ. दीपक लांडगे व डॉ. अर्चना पंडगे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सदर तरुण किशोर कदम यास लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी सांगितले.
तरुणाजवळ चिठ्ठी...
या तरुणाजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून, या चिठ्ठीत त्याने लिहिले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर जीवन अंधकारमय झाले आहे. आता आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, म्हणून आपण हा कठोर निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.