मराठा आरक्षणासाठी संपवले जीवन; लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील घटना
By संदीप शिंदे | Published: November 3, 2023 05:17 PM2023-11-03T17:17:01+5:302023-11-03T17:17:16+5:30
सरकारने सतत वेळ मागवून मराठा समाजाची दिशाभूल केल्याची खंत त्यांच्या मनात होती.
बोरगाव काळे (जि.लातूर) : लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे मराठा आरक्षणासाठी एका ४८ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गोविंद मधुकर देशमुख असे मयत व्यक्तीचे नाव असून, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची ही लातूर जिल्ह्यातील चौथी घटना आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बोरगाव काळे येथील गोविंद देशमुख यांनी मागील काही दिवसांपूर्वी गावात ७२ तास उपोषण केले होते. तसेच गावात मागील सहा दिवसापासून साखळी उपोषण सुरू होते, यामध्येही देशमुख यांचा सहभाग होता. दरम्यान, सरकारने सतत वेळ मागवून मराठा समाजाची दिशाभूल केल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे गोविंद देशमुख यांनी गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, बोरगाव काळे व परिसरातील मराठा समाज बांधवांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन केले. तसेच प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून भरीव मदत, एका वारसदाराला शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले. यावेळी मंडळ अधिकारी अनिल सूर्यवंशी, तलाठी आशुतोष कांबळे, मुरूडचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके, लातूर ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी आदी उपस्थित होते.