पेद्दे खून प्रकरणी 3 आरोपींना जन्मठेप
By Admin | Published: March 14, 2017 08:41 PM2017-03-14T20:41:56+5:302017-03-14T20:41:56+5:30
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील बहुचर्चित पेद्दे बाप-लेकाच्या खून प्रकरणी 3 आरोपींना लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 14 - रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील बहुचर्चित पेद्दे बाप-लेकाच्या खून प्रकरणी 3 आरोपींना लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस. एम. शिंदे यांनी मंगळवारी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे क्षुल्लक कारणावरून भागुराम नारायण पेद्दे (४५), मुलगा बालाजी भागुराम पेद्दे (२५) या बाप-लेकाचा २६ डिसेंबर २००८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गावातील काही लोकांनी हल्ला करून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेत मयत भागुराम नारायण पेद्दे यांचा भाऊ शंकर पेद्दे हा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात ५१ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ रांजणकर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप कांबळे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब साळुंके आदींनी या प्रकरणाचा तपास करून ५१ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यापैकी दोन आरोपी हे अल्पवयीन होते. लातूर जिल्हा व सत्र न्यायालय क्र. २ चे न्यायाधीश श्रीमती एस.एम. शिंदे यांनी या खून प्रकरणात कलम ३०२, ३२६, १४७, १४८, १४९ आणि ५०४ भादंविनुसार दोषी ठरवत आरोपी नासीर उस्मान पठाण (५८), नसिरोद्दीन उर्फ मुन्ना काझी (३५), शेख मुनीर शेख नूर (६२ सर्व रा. पानगाव) या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात न्यायालयाने कलम ३०२ सह १४९ नुसार जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, कलम ३२४ सह १४९ नुसार प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी, १४७ सह १४९ नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि १४७ सह १४९ नुसार दोन वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दोषी आरोपीला ही शिक्षा एकत्रितपणे भोगायची आहे.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. यामध्ये रेणापूरचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डी.डी. दनदाडे, तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ रांजणकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल अॅड. एस.पी. चव्हाण यांनी काम पाहिले. तर त्यांना पोलीस नाईक राजेंद्र राठोड यांनी सहकार्य केले.
३९० पानांचे दोषारोपपत्र...
पानगाव येथील पेद्दे बाप-लेकाच्या खून प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात ३९० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला ५१ आरोपींविरोधात चालविण्यात आला. ४६ आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. तर पाच आरोपींना दोषी ठरविण्यात आले. यातील एक आरोपी घटनेपासून अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेनंतर त्याच्यावर न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे.
त्या आरोपीचा निकाल राखीव
खटल्यातील पाच दोषी आरोपींपैकी एका आरोपीचे घटनेच्या वेळी १७ वर्षे ६ महिने वय असल्याचा अर्ज बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला अल्यामुळे या आरोपीचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला आहे. हा अर्ज निकाली निघाल्यानंतर आरोपी फिरोज रहिमखान पठाण याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
ती रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश...
पेद्दे बाप-लेकाच्या खून खटल्यात आरोपींना सुनावण्यात आलेली दंडाची रक्कम प्रत्येकी १० हजार रुपये ही मयत भागुराम पेद्दे यांच्या पत्नीस देण्याचे आदेश लातूर जिल्हा व सत्र न्यायालय क्र. २ चे न्यायाधीश श्रीमती एस.एम. शिंदे यांनी दिले आहेत.
पानगावात बंदोबस्त...
पेद्दे बाप-लेकाच्या खून प्रकरणात दोषी आरोपींना मंगळवारी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाणार असल्यामुळे पानगाव येथे दोन अधिकारी आणि २१ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून खटल्यातील दोषी आरोपींना कोणती शिक्षा होणार, याकडे गावकऱ्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते