एक हजार रुपयांसाठी खून करणाऱ्या भावाला जन्मठेप;लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
By राजकुमार जोंधळे | Updated: March 29, 2025 21:06 IST2025-03-29T21:06:22+5:302025-03-29T21:06:45+5:30
प्रधानमंत्री किसान याेजनेचे दाेन हजार रुपये जमा झाले हाेते.

एक हजार रुपयांसाठी खून करणाऱ्या भावाला जन्मठेप;लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर : प्रधानमंत्री याेजनेचे आलेल्या दाेन हजार रुपयांपैकी एक हजार रुपये का दिले नाही म्हणून सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी आराेपी भावाला लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. त्रिपाठी यांनी २८ मार्च राेजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सहायक सरकारी वकील ॲड. रमाकांत पी. चव्हाण यांनी सांगितले, कासारजवळा येथील नागनाथ सुडके हा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याचा भाऊ वैजनाथ याने प्रधानमंत्री याेजनेतील दाेन हजारांपैकी एक हजार नागनाथची पत्नी अंजनाबाई हिला दिले. सदरील एक हजार वैजनाथने का दिले नाही? म्हणून नागनाथने २४ ऑगस्ट २०२१ राेजी रात्री वैजनाथच्या घरावर दगड फेकला. त्यावेळी वैजनाथ घरातून बाहेर आला. त्यानंतर पैशावरून शिवीगाळ करीत काठीने नागनाथ याने वैजनाथच्या डाेक्यावर वार केला. त्यात जखमी हाेऊन बेशुद्ध पडला. उपचाराअंती २५ ऑगस्ट २०२१ राेजी वैजनाथ मरण पावला. त्यानंतर मयत वैजनाथचे मामा विश्वनाथ काेकाटे यांनी गातेगाव पाेलिसात दिलेल्या तक्रारीवरून नागनाथविरुद्ध कलम ३०२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला. तपासाधिकाऱ्यांनी नागनाथविराेधात सबळ पुरावा सादर करून दाेषाराेपपत्र दाखल केले.
खटला लातूर येथील दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. त्रिपाठी यांच्यासमाेर चालविण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने ९ साक्षीदार तपासण्यात आले. पुरावा ग्राह्य धरून आराेपी नागनाथ आश्रुबा सुडके यास जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ॲड. रमाकांत पी. चव्हाण पाखरसांगवीकर यांनी काम पाहिले.