सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप; ६ जणांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण
By राजकुमार जोंधळे | Published: March 8, 2024 06:42 PM2024-03-08T18:42:10+5:302024-03-08T18:42:14+5:30
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर : सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी सासऱ्याला लातूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास, त्याचबराेबरच कलम ५०६ भादंवि अन्वये याच गुन्ह्यात दोन वर्षे सश्रम कारावास व २५ हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.
२०१९ मध्ये सुनेवर सासऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५ / २०१९ कलम ३७६, २ (एन) ३१५, ३२३, ३४ भादंविप्रमाणे सासऱ्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक बावकर यांच्या पथकाने केला. तपासामध्ये प्रमुख साक्षीदार, अनेक सबळ पुरावे शोधून न्यायालयात आरोपीविराेधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
पीडिता ही घरात एकटीच असताना तिला तुझे कुऱ्हाडीने तुकडे करतो, अशी धमकी देऊन सासऱ्याने अत्याचार केला. घडला प्रकार पीडित महिलेने पती आणि सासूला सांगितला असता त्यांनी आमची बदनामी करायची नाही, असे सुनावले. त्यानंतरही आरोपी सासऱ्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केला. अखेर याबाबत भादा पोलिस ठाण्यात पीडितेची सासू, सासरा आणि पतीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पाेलिस निरीक्षक पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, न्यायालयात हा खटला सुरू असताना पीडितेच्या पतीचे निधन झाले.
न्यायालयात ६ जणांची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण...
खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित महिला आणि साक्षीदारांची साक्ष, त्याचबराेबर सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आरोपी सासऱ्याला जन्मठेप आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भाेगावा लागणार आहे. दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री उत्तमराव पवार, ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पाेलिस निरीक्षक धनंजय ढोणे, महिला पोलिस अमलदार कोरे यांनी काम पाहिले.