पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By आशपाक पठाण | Published: December 14, 2023 07:51 PM2023-12-14T19:51:20+5:302023-12-14T19:51:34+5:30
विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती.
लातूर : विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली आहे. मयत विवाहिता जयाबाई गजानन चक्रे (रा. बौद्ध नगर, लातूर) यांना पती गजानन एकनाथ चक्रे व दीर संतोष एकनाथ चक्रे हे तू माहेरहून घर चालविण्यासाठी व घर बांधणीसाठी पैसे घेऊन ये म्हणून नेहमी मारहाण करून त्रास देत होते. दीर संतोष चक्रे याच्या मेव्हण्याला मुलगा झाला आहे, त्याला कपडे व सोने खरेदी करण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आणत नाहीस याचा राग धरून १३ जानेवारी २०२१ रोजी राहते घरी आरोपी गजानन चक्रे व संतोष चक्रे यांनी जयाबाई हिचे अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. त्यात जयाबाई ही ४० टक्के भाजल्याने तिचेवर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू असताना १२ फेब्रुवारी ती मयत झाली होती. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तद्नंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी व माहीतगार साक्षीदार यांचे जबाब नोंदवून तपास अधिकारी सपोनि. दयानंद पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
९ जणांच्या साक्षीत, लहान मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची...
प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी.रोटे यांचे समोर झाली. यात ९ साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या. सदरचा खून हा मयताचा लहान मुलगा याचे समोर झाल्याने त्याने तशी साक्ष न्यायालयात दिली. मुलाची जबानी ग्राह्य धरून समर्थनीय पुरावा आल्याने आरोपी गजानन एकनाथ चक्रे (४०) यास कलम ३०२ खाली दोषी ठरवत जन्मठेप, तर कलम ४९८(अ) खाली २ वर्ष शिक्षा व ५०० रू. दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी तपासात पोना. वाजीद चिखले, पैरवी अंमलदार म्हणून कोतवाड यांनी काम पाहिले. विवेकांनद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी वेळोवेळी आरोपींना समन्स, वॉरंट बजावणीसंदर्भात पाठपुरावा केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री यू. पवार यांनी काम पाहिले.