इस्त्रीचे चटके देत छळ करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; सासूला दोन वर्षांचा सश्रम कारावास
By राजकुमार जोंधळे | Published: January 6, 2024 07:17 AM2024-01-06T07:17:13+5:302024-01-06T07:41:22+5:30
लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण आणि सासू महानंदा हरके यांनी पूजा हीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबराेबर आईकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, म्हणून सतत इस्त्रीचे चटके देऊन, मारहाण करत होता.
लातूर : इस्त्रीचे चटके देऊन, छळ करून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा तर सासूला दाेन वर्षे कारावासाबराेबरच दंडाची शिक्षा लातूर येथील सत्र न्यायाधीश रोटे यांनी सुनावली.
दर्जी बोरगाव (ता. रेणापूर) येथील लक्ष्मण हरके यांचे लग्न लातूर येथील पूजा हारके हिच्यासोबत झाले हाेते. मयत पूजा हारके ही लातूर येथील बदामे यांच्या वसतिगृहात लहानपणी दाखल झाली होती. दरम्यान, त्या मुलीचा सांभाळ पुष्पा काडोदे हिने केला. यातील महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने मयत पूजाचा विवाह लक्ष्मण हारके याच्यासोबत लावून दिला. लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण आणि सासू महानंदा हरके यांनी पूजा हीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबराेबर आईकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, म्हणून सतत इस्त्रीचे चटके देऊन, मारहाण करत होता. यात पूजाचा मृत्यू झाला त्यादिवशी तिच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली हाेती. शिवाय, शरीरावर भाजलेल्या, इतर २९ जखमाचे व्रण शवविच्छेदनामध्ये आढळून आले. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या ॲड. मीरा मनोज कुलकर्णी-देवणीकर यांचा युक्तिवाद, घटनास्थळाचे, मयताचे घेतलेले फोटो, वैद्यकीय पुरावा, अंगुली निर्देशांकतज्ज्ञ व मयत मुलीच्या शेजाऱ्याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. याप्रकरणी रेणापूर ठाण्यात कलम ३०२, ४९८-अ, ३०४- ब आणि कलम ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला हाेता.
लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश रोटे यांनी गुन्ह्यातील आरोपी लक्ष्मण हारके याला दोषी ठरवले. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १ हजाराचा दंड ठाेठावला, तसेच कलम ४९८ अन्वये सासूला दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. मयत पूजाची सासू महानंदा हारके हिला कलम ४९८ अन्वये दोन वर्षांचा सश्रम कारवास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून मीरा कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. प्रजाता इनामदार, ॲड. अश्विनी दिवाण, ॲड. मनाठकर यांनी मदत केली. तपासणी अंमलदार म्हणून पाेलिस निरीक्षक गोरख दिवे यांनी काम पाहिले, तर कोर्ट ड्यूटी पोलिस जाधव यांनी सहकार्य केले.