'त्या' तरुणाच्या खुनप्रकरणी लातुरात आरोपीला जन्मठेप; दुसऱ्या आरोपीला ७ वर्षांचा कारावास 

By राजकुमार जोंधळे | Published: August 17, 2023 10:58 PM2023-08-17T22:58:57+5:302023-08-17T22:59:31+5:30

न्यायालयाचा निकाल

Life imprisonment for the accused in Laturat murder case of youth; 7 years imprisonment for the second accused | 'त्या' तरुणाच्या खुनप्रकरणी लातुरात आरोपीला जन्मठेप; दुसऱ्या आरोपीला ७ वर्षांचा कारावास 

'त्या' तरुणाच्या खुनप्रकरणी लातुरात आरोपीला जन्मठेप; दुसऱ्या आरोपीला ७ वर्षांचा कारावास 

googlenewsNext

लातूर : शहरातील एका तरुणाचा शुल्लक कारणावरून चाकूने सपासप वार करत खून केल्याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाला जन्मठेप तर दुसऱ्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा गुरुवारी सुनावली. या खून खटल्यात एकूण ११ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. 

सरकारी वकिल संतोष देशपांडे यांनी सांगितले, लातुरातील शिवाजी शाहू कापसे (रा. प्रकाशनगर, लातूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात २५ ऑक्टोबर २०२० रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मुलगा अशोक शिवाजी कापसे हा त्याचा मित्र मोहित बावणे याच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. नंतर अशोक कापसे हा मोहित बावणे याच्यासोबत रात्री विक्रमनगर येथे अजय पिसाळ याला भेटण्यासाठी गेला होता. दरम्यान, तू मला फोनवर शिवीगाळ का केलीस? असे म्हणून अजय पिसाळ याने मोहित बावणे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडवण्यासाठी अशोक कापसे हा मध्यस्थी करत होता. त्यावेळी अजय पिसाळ याने भाऊ विजय पिसाळ याला बोलावून घेतले. विजय पिसाळ याने अशोक कापसे याच्या गळ्यावर, छातीवर, पायावर सपासप वार करून गंभीर जखमी करून खून केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गु.र.नं.४४९/ २०२० कलम ३०२, ३०७, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

पोलिस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर यांनी तपास करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ चे न्यायाधीश डी. बी. माने यांच्या समोर चालला. यामध्ये ११ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. तर प्रत्यक्षदर्शी साक्ष नोंदवण्यात आली. त्याचबरोबर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही साक्ष, पुराव्याच्यावेळी सादर करण्यात आले. सुनावणीअंती विजय दिनकर पिसाळ (वय २५) याला कलम ३०२ नुसार दोषी ठरवत आजन्म कारावास, कलम ३०७ नुसार सात वर्षाची शिक्षा, पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर अजय दिनकर पिसाळ (वय २७) याला कलम ३०७ नुसार सात वर्ष शिक्षा आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना वकिल प्रियंका देशपांडे, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले. समन्वयक  म्हणून पैरवी अधिकारी हवालदार आर. टी. राठोड , ज्योतिराम माने यांनीही सहकार्य केले.

Web Title: Life imprisonment for the accused in Laturat murder case of youth; 7 years imprisonment for the second accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.