कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
By राजकुमार जोंधळे | Published: February 20, 2024 08:43 PM2024-02-20T20:43:59+5:302024-02-20T20:44:07+5:30
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.
राजकुमार जोंधळे / लातूर : जिल्ह्यातील खानापूर (ता. रेणापूर) येथे कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी मंगळवारी जन्मठेप आणि दाेन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
खानापूर येथील सिद्धाजी श्रीराम जाधव (वय ३३) याने पत्नी आरती जाधव (२४) हिचा कुऱ्हाडीचे घाव घालून २०१८ मध्ये खून केला हाेता. खुनाच्या घटनेनंतर आराेपी पती हा रेणापूर पाेलिस ठाण्यात स्वत: हजर झाला हाेता. याप्रकरणी रेणापूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०२, ४९८ (अ) अन्वये सिद्धाजी जाधव आणि त्याच्या आई-वडिलाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पाेलिस निरीक्षक गाेरख दिवे, सहायक पाेलिस निरीक्षक तरकसे यांनी करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले हाेते. लातूर न्यायालयात एकूण दहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. त्याचबराेबर डाॅक्टर आणि पाेलिसांचीही साक्ष महत्त्वपूर्ण झाली. साक्ष आणि सबळ पुराव्याच्या आधारे लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. राेटे यांनी कलम ३०२ नुसार आराेपी सिद्धाजी श्रीराम जाधव याला जन्मठेप, दोन हजारांचा दंड, कलम ४९८ (अ) नुसार दाेन वर्षांची शिक्षा आणि दाेन हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावली. दंड नाही भरल्यास स्वतंत्र दोन महिन्यांची शिक्षा सुनावली.
या खटल्याचे काम सरकारी वकिल संतोष देशपांडे यांनी पाहिले. त्यांना दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून राठोड, पोलिस कर्मचारी स्वाती जाधव यांनीही सहकार्य केले.