लातूरच्या तरूणाचे अवयवदान, सहा जणांचे आयुष्य फुलले ! भावेष तिवारी यांच्या आई-वडिलांचा प्रेरणादायी निर्णय

By आशपाक पठाण | Updated: March 27, 2025 23:29 IST2025-03-27T23:29:20+5:302025-03-27T23:29:44+5:30

अपघातात ब्रेनडेड

life of six people blossomed after the donation of a young man from Latur Inspiring decision of Bhavesh Tiwari's parents | लातूरच्या तरूणाचे अवयवदान, सहा जणांचे आयुष्य फुलले ! भावेष तिवारी यांच्या आई-वडिलांचा प्रेरणादायी निर्णय

लातूरच्या तरूणाचे अवयवदान, सहा जणांचे आयुष्य फुलले ! भावेष तिवारी यांच्या आई-वडिलांचा प्रेरणादायी निर्णय

लातूर : दुचाकी अपघातात ब्रेनडेड झालेल्या लातूर येथील भावेष संतोष तिवारी (वय २० रा. बालाजी मंदिराजवळ, हमाल गल्ली, लातूर) या तरूणाचे गुरूवारी हैद्राबाद येथील खाजगी रूग्णालयात २७ मार्च रोजी अवयवदान करण्यात आले. आई-वडिलांनी संमती दिल्यावर भावेषच्या दोन्ही किडनी, लिव्हर, हार्ट, डोळे दान करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्याद्वारे सहा जणांचे आयुष्य फुलले आहे.

रंगपंचमीच्या दिवशी (१९ मार्च) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास औसा रोडवरील वासनगाव येथील राधास्वामी सत्संग मंडळाचा सत्संग होता. त्यासाठी भावेश संतोष तिवारी (वय २० रा. हमाल गल्ली, लातूर) हा आईसोबत दुचाकीवर निघाला होता. तेव्हा वासनगाव पाटी येथे दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या मोटारसायकलची धडक बसली. यात भावेष गंभीर जखमी झाला तर आई अरूणा तिवारी यांनाही मार लागला होता. त्यानंतर त्यांना लातुरातील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भावेषच्या मेंदूला मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, तीन दिवसानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रूग्णास इतरत्र हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तद्नंतर भावेषला हैदराबाद येथील यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रूग्णास वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, तिसऱ्या दिवशी ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले.

कुटुंबावर आभाळ कोसळले...

डॉक्टरांनी मुलगा भावेष ब्रेनडेड झाल्याचे सांगितल्यावर कुटुंबियावर दु:खाचा डोंगर काेसळला. अशा परिस्थितही आई अरूणा तिवारी, वडील संतोष तिवारी यांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गुरूवारी भावेषच्या दोन्ही किडनी, लिव्हर, हार्ट, डोळे अवयवदान करण्यात आले. त्यामुळे इतर सहा जणांचे आयुष्य फुलले आहे.

लातूर येथे आज अंत्यसंस्कार...

हैद्राबाद येथे अवयवदानाची प्रक्रिया गुरूवारी पार पडल्यानंतर रात्री भावेष तिवारीचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. लातूर शहरातील नांदगाव वेस स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी १० वाजता भावेषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: life of six people blossomed after the donation of a young man from Latur Inspiring decision of Bhavesh Tiwari's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर