लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यतेसाठी बसव सेवा संघाचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 08:41 PM2018-07-13T20:41:50+5:302018-07-13T20:42:09+5:30
लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आहे. मात्र सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता देता येत नसल्याचे वक्तव्य केले.
लातूर : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आहे. मात्र सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्ममान्यता देता येत नसल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध बसव सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी लातूर येथे करण्यात आला. बसवेश्वर उद्यानासमोर झालेल्या आंदोलनात लिंगायत समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील लिंगायत समाजाच्या परंपरा आणि प्रथा लक्षात घेऊन त्या-त्या राज्यांनी केंद्र शासनाकडे स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता देण्यासंदर्भात शिफारस करावी. गेल्या पाच वर्षांपासून लिंगायत समाजाच्या वतीने मोर्चे, आंदोलने करून लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी गुरुवारी विधानसभेच्या अधिवेशनात लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देता येत नाही. लिंगायत धर्म हा हिंदू धर्माचाच एक पंथ आहे, असे वक्तव्य करून लिंगायत समाजविरोधी भूमिका जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी लातुरात बसवेश्वर उद्यान परिसरात आंदोलन झाले.
आंदोलनात बसव सेवा संघाचे अध्यक्ष बालाजीअप्पा पिंपळे, संजय राजुरे, शशिकांत बुलबुले, एस.बी. चिलबिले, श्रीनिवास मेनकुदळे, अमित पाटील, अमित खराबे, सुनील ताडमाडगे, ईश्वर तत्तापुरे, अॅड. अजय कलशेट्टे, शिवहर बिराजदार, महेश बिडवे, अमोल वांगजे, कमलाकर कांबळे, अमर बुरबुरे, गणेश तळणे, प्रेम शेटकार, निलेश कुरडे, संतोष सुलगुडले, विशाल झुंजे पाटील, प्रसाद बेरकिळे आदी सहभागी झाले होते.