लिंगदाळ गाव आठवडाभरासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:23+5:302021-04-23T04:21:23+5:30
शिरूर ताजबंद : अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ येथे कोरोना बाधितांची संख्या २७ वर पोहोचली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने ...
शिरूर ताजबंद : अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ येथे कोरोना बाधितांची संख्या २७ वर पोहोचली आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने आठ दिवसांसाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.
लिंगदाळ हे १४०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, संसर्ग कमी होत नाही. काही दिवसांपूर्वी २ ते ३ कोरोना बाधित होते. आता ती संख्या २७ वर पोहोचली आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण झाले आहे. २७ पैकी ११ जण होम क्वारंटाईन आहेत. तर ६ जणांना मरशिवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दहा जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गावातील संसर्ग रोखण्यासाठी गावक-यांनी आठवडाभर गाव बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यावेळी त्यामुळे गावातून कोणालाही बाहेरगावी जाता येणार नाही. तसेच परगावच्या व्यक्तींना गावात प्रवेश करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वस्तू पुरविण्याची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती सरपंच धनेश्वर गुरमे यांनी दिली. यावेळी उपसरपंच संतोष येमले, चेअरमन मुरहरी नागमे, मुख्याध्यापक संजीव नलवाड, तलाठी शाम कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक धीरज भंडे, आशा स्वयंसेविका शितल पुलगर्ले आदी उपस्थित होते.
तपासणीसाठी दोन पथके...
गावातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके दिवसातून दोनदा तपासणी करुन अहवाल सादर करतील. नागरिकांनी चिंता करु नये. काळजी घ्यावी, असे आवाहन शिरूर ताजबंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सारोळे, डॉ. मारोती पाटील यांनी दिली.