नळेगाव बाेळेगाव येथे दारू जप्त; जीपसह सहा जणांना केली अटक
By राजकुमार जोंधळे | Published: November 13, 2022 07:51 PM2022-11-13T19:51:45+5:302022-11-13T19:52:07+5:30
नळेगाव बाेळेगाव येथे दारू जप्त करण्यात आली असून जीपसह सहा जणांना केली अटक करण्यात आली आहे.
लातूर : जिल्ह्यातील बाेळेगाव आणि नळेगाव परिसरात अवैध दारू विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. जीपसह देशी-विदेशी दारूसाठा असा एकूण ६ लाख २० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी सहा जणांना अटक केली आहे. याबाबत स्वतंत्र तीन गुन्हे दाखल केले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यासाठी विशेष पथकांकडून हाॅटेल, ढाबा आणि चाेरट्या मार्गाने वाहनातून वाहतूक करण्यात येणाऱ्या दारूवर विशेष नजर ठेवली जात आहे. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बाेळेगाव आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास सापळा लावण्यात आला.
माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची जीप मार्गस्थ हाेताना ती अडवून झाडाझडती घेतली असता, त्यात देशी दारूचे - ३५ बाॅक्स, विदेशी दारू - १ बाॅक्स असा मुद्देमाल आढळून आला. जीपसह एकूण ६ लाख २० हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. यावेळी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वतंत्र तीन गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
ही कारवाई लातूर येथील औरंगाबाद विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमाेल शिंदे, स्वप्निल काळे, अ. ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, ए. एल. कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, चालक परळीकर यांच्या पथकाने केली.