चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा;साडेपाच लाखांची ताडी-दारू जप्त
By राजकुमार जोंधळे | Published: March 18, 2023 06:56 PM2023-03-18T18:56:13+5:302023-03-18T18:56:25+5:30
दाेघांना अटक : उत्पादन शुल्कची कारवाई...
लातूर : निलंगा तालुक्यातील कासार शिरसी आणि औराद शहाजानी परिसरात चार ठिकाणच्या दारू, हातभट्टी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या पथकाने छापा मारला. यावेळी वाहनासह हातभट्टी दारू असा एकूण ५ लाख ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निलंगा तालुक्यात हातभट्टीची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती उदगीर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने कासार शिरसी, औराद शहाजानी परिसरात असलेल्या चार ठिकाणच्या हातभट्टी दारू अड्ड्यांवर एकाच वेळी पथकाने छापा मारला. यावेळी एक कार, ९६० लीटर ताडी, १७७ लीटर हातभट्टी असा एकूण ५ लाख ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत स्वतंत्र चार गुन्हे दाखल करून, दाेघांना अटक केली आहे. ही कारवाई उदगीर येथील निरीक्षक आर.एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एस.पी. काळे, ए.बी. जाधव, एल.बी. माटेकर, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान एस.व्ही. केंद्रे, एच.एस. मुंडे, जे.आर. पवार यांच्या पथकाने केली.