लातूरला पाणी पुरणाऱ्या मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा स्थिर, आता परतीच्या पावसावर मदार

By हणमंत गायकवाड | Published: August 30, 2022 04:41 PM2022-08-30T16:41:43+5:302022-08-30T16:42:15+5:30

दहा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा नाही

Live water storage in Manjra dam stable, inflow decreased due to lack of rain | लातूरला पाणी पुरणाऱ्या मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा स्थिर, आता परतीच्या पावसावर मदार

लातूरला पाणी पुरणाऱ्या मांजरा धरणातील जिवंत पाणीसाठा स्थिर, आता परतीच्या पावसावर मदार

Next

लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची वाढ नाही. यंदाच्या पावसाळ्यात २८.६२९ दलघमी नवीन पाणी आले आहे. आता धरणात एकूण ७५.९१६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. जो की, गेल्या दहा दिवसांपासून स्थिर आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठा जैसे थे आहे. 

मांजरा प्रकल्पातून दररोज लातूर शहरासाठी ४० ते ४५ एमएलडी पाणी उचलले जाते. त्यातून शहराला चार दिवसांआड पुरवठा केला जातो. यंदा पहिल्यांदाच धरणामध्ये  सुरुवातीच्या पावसात साठा झाला असला तरी गेल्या दहा दिवसांपासून प्रकल्पात नव्याने पाणी आले नाही. २० पासून ३० ऑगस्टपर्यंत वाढ नाही. ४२.९० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. २० तारखेला जो धरणात साठा होता, तोच ३० तारखेपर्यंत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यातील ४७.२८७ दलघमी पाणी धरणात होते. त्यात २८.६२९ दलघमीची यंदा वाढ झाली आहे. 

१७६.९६३ जिवंत पाणीसाठा क्षमता
मांजरा प्रकल्पात १७६.९६३ दलघमी जिवंत पाणी साठवणूक क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ७५.९१६ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. गेल्या २० तारखेपासून हा साठा स्थिर आहे. या धरणावर लातूर शहरासह एमआयडीसी, औसा एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब आदी शहरांचा पाणी पुरवठा आहे. 

परतीच्या पावसावरच मदार... 
२०१६ च्या अभूतपूर्व पाणीटंचाईनंतर दरवर्षी धरण जवळपास भरत आलेले आहे. गेल्या सहा वर्षांत परतीच्या पावसानेच धरण भरलेले आहे. यंदा प्रारंभीच्या पावसात धरणात २८.६२९ दलघमी पाणी झाले आहे. साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येच धरण भरले असल्याचा पुर्वानुभव आहे. त्यामुळे परतीच्या पावसावरच मदार आहे. 

प्रकल्प क्षेत्रात ४१३ मि.मी. पाऊस 
प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४१३.३० मि.मी. पाऊस झाला असून, १६ ऑगस्टपासून प्रकल्प क्षेत्रात पाऊस न झाल्याने तेव्हापासून पाण्याचा येवा बंद झालेला आहे. 

प्रकल्पाची सद्य:स्थिती
६३९.४० मीटर सद्य:स्थितीत पाण्याची पातळी 
१२३.०४६ धरणातील पाणीसाठा
४७.१३० धरणातील मृत पाणीसाठा
७५.९१६ दलघमी धरणातील जिवंत साठा

धरणाची एकूण क्षमता
६४२.३७ मीटर पाणी पातळी क्षमता
२२४.०९३ दलघमी पाणीसाठा क्षमता
१७६.९६३ दलघमी जिवंत पाणीसाठा क्षमता

Web Title: Live water storage in Manjra dam stable, inflow decreased due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.