लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच!
By हरी मोकाशे | Published: May 20, 2024 06:38 PM2024-05-20T18:38:42+5:302024-05-20T18:39:25+5:30
लातूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धनचे कर्मचारी पोहोचताहेत गोठ्यागोठ्यात
लातूर : राज्य शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने काही महिन्यांपासून पशुधनाचे आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ११ हजार ६५० पशुधन असतानाही पशुसंवर्धनने उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक काम करीत ६ लाख ८ हजार ईअर टॅगिंग केले आहे. मात्र, अद्यापही हे काम अपूर्णच असल्याने अधिकारी, कर्मचारी हतबल होत आहेत.
भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर शिक्का असल्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी- विक्री, उपचार केले जाणार नाही. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत पशुधनाचे आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जवळपास सन २०१६- १७ पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे म्हणून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक पशुधन...
तालुका - पशुधन
अहमदपूर - ६५ हजार ७२९
औसा - ७६ हजार ६२२
चाकूर - ५१ हजार ९९९
देवणी - ३० हजार २४६
जळकोट - २६ हजार ३९७
लातूर - ७० हजार ६१६
निलंगा - ६८ हजार ३७६
रेणापूर - ४७ हजार १९९
शिरुर अनं. - २० हजार ८२७
उदगीर - ५३ हजार ६३९
एकूण - ५ लाख ११ हजार ६५०
ईअर टॅगिंग नसल्यास उपचारही नाही...
शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. वास्तविक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन घेणे आवश्यक आहे. ईअर टॅगिंगमुळे नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का अथवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधन दगावल्यास त्या पशुधनाच्या मालकास नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच खरेदी- विक्री करणे सोयीचे होणार आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर पशूधन खरेदी- विक्री करता येणार नाही. तसेच शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारही केले जाणार नाहीत.
पशुपालकांचा हलगर्जीपणा, ईअर टॅगिंगचे काम संपेना...
सुरुवातीस बहुतांश पशुपालकांमध्ये ईअर टॅगिंगसंदर्भात उदासीनता होती. त्यांना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, काही पशुपालक ईअर टॅगिंग करतात आणि त्यानंतर ते टॅग काढून टाकतात. तसेच काही वेळेस खरेदी- विक्रीवेळी टॅग काढून टाकण्यात येते. अशा समस्यांमुळे पशुधनाच्या तुलनेत टॅगिंगचे काम अधिक प्रमाणात झाल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.
पशुपालकांनी पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे...
पशुधन आधारकार्ड काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करुन मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ११ हजार पशुधन असून ६ लाख ८ हजार टॅगिंग करण्यात आले आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर कुठल्याही मोफत सुविधा, योजना पशुपालकांना मिळणार नाही. त्यामुळे पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावे.
- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.