वाऱ्याच्या दिशेनुसार फिरते टोळधाड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:21 PM2020-05-27T19:21:43+5:302020-05-27T19:27:31+5:30
या किडीचे थवे महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहेत. हे थवे ताशी १२ ते १६ किमी वेगाने उडतात.
लातूर : मध्यप्रदेशातून विदर्भातील काही जिल्ह्यात टोळधाड दाखल झाली आहे. ती वाऱ्याच्या दिशेनुसार आपली दिशा बदलत असते. जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी आहे. तरीही दक्षता म्हणून कृषी विभागाने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी बुधवारी दिली. सध्या गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
या किडीचे थवे महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती जिल्ह्यात दिसून येत आहेत. हे थवे ताशी १२ ते १६ किमी वेगाने उडतात. ही टोळी कीड समूहाने उडते व आपल्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया आदीचा फडशा पाडते. ही कीड अत्यंत चपळ व खादाड असून नाकतोडा गटातील आहे. एका दिवसात ही टोळ त्याच्या वजनाएवढे अन्न खाते, असे जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
रात्रीच्या वेळी झाडावर जमा होते टोळ...
रात्रीच्या वेळी ही टोळी झाडा-झुडपावर जमा होते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी कृषी आणि शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करावे लागतात. कृषी विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती येत आहे. सध्याच्या परिस्थितीत ही टोळ लातूर जिल्ह्यात येण्याची शक्यता कमी आहे. तरीही खबरदारी म्हणून आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.
बंदोबस्तासाठी नियोजन करावे...
देशातील अनेक राज्यात या टोळधाडीने धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रात ही प्रवेश केला आहे. ज्या ठिकाणी ही टोळधाड जाईल, तिथे काही शिल्लक राहत नाही. सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळी भुईमूग, काकडी, टरबूज यासह फळे-भाजीपाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने टोळधाडीच्या बंदोबस्तासाठी नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे.