Lok Sabha Election 2019 : लातुरात निलंगेकर, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:21 IST2019-04-02T18:18:37+5:302019-04-02T18:21:54+5:30
ग्राउंड रिपोर्ट : काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांची १५ दिवसांच्या प्रचारात होणार दमछाक

Lok Sabha Election 2019 : लातुरात निलंगेकर, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला
- हणमंत गायकवाड
लातूर : काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दमछाक करणारी लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातील लढाई चुरशीची होणार आहे. भाजपमधील उमेदवारीवरून झालेला वाद आणि काँग्रेसमध्ये उमेदवार कोण, यावर झालेला संभ्रम दूर झाला असून, आता लढत दुरंगी होणार की तिरंगी, हे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात कळणार आहे.
काँग्रेसकडून मच्छिंद्र कामंत, भाजपकडून सुधाकर शृंगारे तर वंचित बहुजन आघाडीकडून राम गारकर मैदानात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण दहा उमेदवार आता रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा घेऊन प्रचाराचा औपचारिक प्रारंभ केला, परंतु रणधुमाळीसाठी दोन्ही मुख्य पक्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत आहेत की काय, असेच सध्या तरी वातावरण आहे. उमेदवार आघाडी आणि युतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. कार्यकर्ते मात्र प्रचार आदेशाच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत.
लातूरची लढाई कामंत विरुद्ध शृंगारे रंगणार असली, तरी माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याच प्रतिष्ठेची राहणार आहे. मच्छिंद्र कामंत यांचे वक्तृत्व, शिक्षण आणि पहिल्याच मुलाखतीतील त्यांनी सांगितलेला सर्वधर्मसमभावाचा विचार हा लातूर लोकसभेच्या राजकीय परंपरेला साजेसा आहे, ही त्यांची जमेची बाजू, परंतु उदगीर, जळकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक वगळता तुटलेला संपर्क ते पुन्हा कसा जोडतात, हे आव्हान आहे.
भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संपर्क ठेवला. काही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमधून थेट संवाद निर्माण केला. इतकेच नव्हे, स्थानिक नेतृत्वाचे पाठबळ सर्वार्थाने लाभले, ही जमेची बाजू. पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांना संवाद आहे, परंतु सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हा संवाद कसा न्यायचा, हे आव्हान त्यांच्यापुढे आहे. काँग्रेस, भाजपच्या लढाईत वंचित बहुजन आघाडीचे राम गारकरही चर्चेत राहणार आहेत. तूर्त वातावरणातील गरमी वाढली असली, तरी सर्व उमेदवारांचा प्रचार थंड आहे. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रंगात येईल.
प्रमुख उमेदवार :
मच्छिंद्र कामंत । काँग्रेस
सुधाकर शृंगारे । भाजप
राम गारकर । वंचित आघाडी
कळीचे मुद्दे
२०१४ च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या खासदारांना तिकीट नाकारून भाजपाने नवा चेहरा दिला आहे. मतदारसंघात प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलेल्या नावांना पूर्णविराम देत काँग्रेसनेही नवा चेहरा मैदानात उतरविला आहे.
स्थानिक नेत्यांचा प्रभाव
शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या प्रगल्भ नेतृत्वाने लातूरचे प्रतिनिधित्व संसदेत केले आहे. उमेदवाराचे व्हिजन आणि विचार याला प्राधान्य देणारी इथली जनता आहे. तसेच आघाडीतील पक्षांची एकजूट, कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक नेत्यांचा जनमानसातील प्रभाव पाठीशी आहे.
- मच्छिंद्र कामंत, काँग्रेस
भाजपला साथ
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे समर्थन आणि पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात संवाद आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमधून थेट जनतेशी संपर्क ठेवला. मोठ्या मताधिक्याने भाजपाला साथ देणारा हा मतदारसंघ आहे.
- सुधाकर शृंगारे, भाजप