‘नीट’मध्ये ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा, लोकेश मंडलेचा राज्यात तिसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:34 PM2018-06-04T20:34:13+5:302018-06-04T20:34:13+5:30
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे.
लातूर - येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे.
वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ २०१८ च्या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातील ११३८ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. तर १४८ विद्यार्थ्यांचे ५०० पेक्षा अधिक गुण आहेत. महाविद्यालयातील सर्वसाधारण संवर्गातून ४२३ विद्यार्थी व राखीव संवर्गातून १२८ अशा एकूण ६५१ विद्यार्थ्यांना शासकीय व अशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खात्रीशीर प्रवेश मिळू शकेल. तर १२० विद्यार्थी शासकीय व अशासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकतील. त्याचबरोबर दयानंद विज्ञान महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. एकूण ५०३ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर, श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. चंद्रभानू सोनवणे, जयक्रांती, राजमाता जिजामाता महाविद्यालयांनीही उल्लेखनीय यश मिळविले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणार : लोकेश मंडलेचा
‘नीट’मध्ये राज्यात तिसरा आल्याचा निश्चितच आनंद आहे. येणाऱ्या १८ जूनला एम्सचा निकाल येईल. त्याच्यातही मला यशाची खात्री असून, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात मधुमेह, मेंदूविकार या आजारांवर संशोधन करायचे आहे, असा मानस लोकेश मंडलेचा याने व्यक्त केला. ‘लोकमत’शी बोलताना लोकेश म्हणाला, शालेय शिक्षण परळी व हैदराबाद येथे झाले. अकरावी व बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण लातुरात पूर्ण केले. प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. गणेश चौगुले, प्रा. रेड्डी, प्रा. पुरी, प्रा. पी. विवेकानंद या सर्वांचेच मार्गदर्शन मिळाले. नियमित अभ्यास आणि आई-वडिलांचे पाठबळ हे माझ्या यशाचे गमक आहे. वडील डॉ.पारस मंडलेचा हे शासकीय सेवेत वैद्यकीय अधीक्षक आहेत. वडील, आई डॉ. कविता, भाऊ प्रतीक यांनी सदैव प्रोत्साहन दिले.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आम्ही रुग्ण सेवेसाठी संशोधन क्षेत्राकडे वळलो तरच समाजाला अधिक लाभ मिळू शकेल, हे माझे ठाम मत असल्याचेही लोकेश म्हणाला.
लोकेशच्या यशाबद्दल डॉ. पारस मंडलेचा म्हणाले, लोकेश व प्रतीक हे दोघेही लहानपणापासूनच हुशार आहेत. दोघेही एनटीएसई परीक्षेत पात्र ठरले होते. सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे ठरले, असेही ते म्हणाले.