लोकमत इफेक्ट : खेळाडूंना मिळणार आता तंत्रशुद्ध मार्गदर्शन; राज्यातील क्रीडा मार्गदर्शकांच्या भरतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:45 PM2019-12-18T12:45:46+5:302019-12-18T12:51:13+5:30
चार महिन्यांपूर्वी शासनाने क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्ती संदर्भात परिपत्रक काढले होते. मात्र त्यानंतर सर्व थंडच होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला.
- महेश पाळणे
लातूर : खेळाडू घडविण्याचे मुख्य स्त्रोत असलेले मार्गदर्शक गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू घडविण्याचा शासनाचा उद्देश असला तरी क्रीडा मार्गदर्शकांअभावी त्याला हरताळ फासली जात होती. चार महिन्यांपूर्वी शासनाने क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्ती संदर्भात परिपत्रक काढले होते. मात्र त्यानंतर सर्व थंडच होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला. परिणामी, मंगळवारी क्रीडा आयुक्तांनी भरती संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रीडा मार्गदर्शकांअभावी प्रशिक्षण केंद्रातील मैदाने रिकामी
आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडूंनी पदके पटकावीत ही अपेक्षा घेऊन राज्यातील सर्वच जिल्ह्यांत क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कालांतराने यात सातत्य राहिले नाही. चार वेळा क्रीडा मार्गदर्शकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यामुळे राज्यातील प्रशिक्षण केंद्रे ओसाड पडली होती. आॅगस्ट २०१९ मध्ये शासनाने पुन्हा ही पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापुढे कोणतीच कारवाई झाली नाही. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘क्रीडा मार्गदर्शकांअभावी प्रशिक्षण केंद्रे पडली ओस’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत राज्याच्या क्रीडा विभागाने १७ डिसेंबर रोजी पत्रक काढून राज्यातील सर्व क्रीडा उपसंचालकांना क्रीडा मार्गदर्शकाच्या भरती संदर्भात तात्काळ कारवाई करावी, अशा मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे क्रीडा मार्गदर्शकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, राज्यातील सर्वच जिल्ह्यांत खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान तीन मार्गदर्शक...
राज्यभरात एकूण ११० क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरली जाणार असून, प्रत्येक जिल्ह्याला किमान तीन क्रीडा मार्गदर्शक मिळणार आहेत. जिल्ह्यातील प्रचलित खेळ व गरज असलेल्या खेळाला मार्गदर्शक मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रशिक्षित मार्गदर्शकाकडून योग्य प्रशिक्षण मिळणार आहे.
एनआयएस कोचेसला आधार...
भारतात पटियाला, बंगळुरु, कोलकाता येथे एक वर्षाचा प्रशिक्षणाचा कोर्स केलेले एनआयएस क्रीडा मार्गदर्शक राज्यभरात अनेक आहेत. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र शासनाकडून क्रीडा मार्गदर्शकांची भरती नसल्याने क्रीडा प्रगती खुंटली होती. एनआयएस प्रशिक्षक हा प्रशिक्षण देण्यासाठी परिपूर्ण असतो. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात यांना महत्त्व आहे. शासनाच्या या नवीन भरतीमुळे राज्यातील एनआयएस क्रीडा मार्गदर्शकांना एकप्रकारे आधार मिळणार आहे.