घरफोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास; तगरखेड्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 07:46 PM2018-01-18T19:46:58+5:302018-01-18T19:47:40+5:30
निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे घराचे कुलूप तोडून साडेसतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
औराद शहाजानी ( लातूर) : निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे घराचे कुलूप तोडून साडेसतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी लातूरहून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांस पाचारण करण्यात आले आहे़
तगरखेडा (ता़ निलंगा) येथील सोमनाथ गुरुनाथ कल्याणे हे आपल्या परिवारासोबत बुधवारी रात्री जेवण करुन पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले.तसेच कुटुंबातील अन्य मंडळी आपआपल्या खोलीत गेली. दरम्यान, रात्री १० ते पहाटे ५ वा़ पर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ कपाटाचे कुलूप तोडत सोन्याच्या पाटल्या, लॉकेट, अंगठ्या असा एकूण साडेसतरा तोळ्यांचे ऐवज पळविला़ त्याची किंमत पावणेचार लाख रुपये आहे़ दरम्यान, सकाळी कुटुंबातील मंडळी उठली असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी कल्याणे यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर, सपोनि़ सुनील रेजितवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली़