कोरोनाच्या संकटातही शिकण्यासारखे भरपूर : डॉ. अविनाश सावजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 07:47 PM2020-07-08T19:47:18+5:302020-07-08T19:48:23+5:30
नीट-जेईईचा ताण कशाला? या विषयावर डॉ. सावजी यांचा ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हवर बुधवारी दीर्घ संवाद झाला.
लातूर : कोरोनाचे संकट आपल्या एकट्यावर नाही, तर ते सबंध जगावर आहे. हे समजून घेऊन या संकटातही शिकण्यासारखे भरपूर आहे. परीक्षांच्या तारखा बदलत गेल्या, नक्कीच विद्यार्थ्यांवर ताण आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना पाठबळ द्या, त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये काही काळ रमू द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश सावजी यांनी केले.
नीट-जेईईचा ताण कशाला? या विषयावर डॉ. सावजी यांचा ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हवर बुधवारी दीर्घ संवाद झाला. ते म्हणाले, देशात १५ लाख कुटुंबात नीट परीक्षेची चिंता आहे. मे मध्ये ताण संपेल, असे समजून सर्वांनी अभ्यास केला. जुलैची परीक्षा सुद्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. ज्यांची थोडी तयारी राहिली आहे, त्यांना दोन महिने मिळाले आहेत. ज्यांचा अभ्यास झाला आहे, त्यांनी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा उजळणी करावी. बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने सर्वांचे लक्ष अभ्यासाकडे असते. मनासारखे काही करता येत नाही. इतकेच नव्हे तर आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. आता अधिकचा मिळालेला वेळ मनासारखे काही करण्यासाठी घालवा. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्या, कोरोनाने आपल्याला हेच शिकविले आहे. परीक्षांच्या तारखा आपल्या हातात नाहीत. परीक्षा संपेपर्यंत तणाव राहणारच आहे. म्हणून चिंता करण्यापेक्षा सकारात्मकपणे भविष्याचा विचार करा. ज्या दिशेने करिअर करायचे आहे, त्याच्यावर विचार करा. काही छंद जोपासा. ध्यान करा. योगा करा. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सावजी म्हणाले.
थोडा विरंगुळा.. थोडी विश्रांती...
सतत अभ्यास केल्याने थकवा, चिडचिड स्वाभाविक आहे. त्यामुळे थोडा विरंगुळा, थोडी विश्रांती घेऊन पुन्हा अभ्यासाला लागा, असा सल्लाही डॉ. सावजी यांनी दिला. यावेळी विद्यार्थी, पालकांनी प्रश्नही विचारले.