शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

By संदीप शिंदे | Published: May 15, 2023 07:38 PM2023-05-15T19:38:12+5:302023-05-15T19:38:36+5:30

लम्पी आजारास रोखण्यासाठी येथील श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचारासाठी पथक तयार करण्यात आले आहे

Lumpy attack on livestock in Shirur Anantapal; So far 665 livestock affected | शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

शिरूर अनंतपाळात पशुधनावर लम्पीचा विळखा; आतापर्यंत ६६५ पशुधन बाधित

googlenewsNext

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील पशुधनाला लम्पीच्या आजाराचा विळखा पडला असून, आतापर्यंत ६६५ पशुधनाला लम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. तर ६२ पशुधन दगावले असून, उपचार घेऊनही आजार बरा होत नसल्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.

शिरूर अनंतपाळ परिसरातील श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत लम्पीसारख्या कातडीच्या रोगाने तालुक्यात आतापर्यंत ६६५ जनावरांना ग्रासले असून, त्यामध्ये ६२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन डझनभर जनावरे मृत्यूच्या दारात आहेत.
पशुधनास विषाणूजन्य आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांत भीती निर्माण झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून तालुक्यातील दैठणा, साकोळ, अंकुलगा राणी, उजेड, सांगवी, घुग्गी, येरोळ, डिगोळ, सुमठाणा, हिप्पळगाव, थेरगावसह जवळपास सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात लम्पी आजाराने डोके वर काढले असून, उपचार घेऊन सुद्धा आजार आटोक्यात येत नसल्याने पशुपालकांत चिंता आहे.

तालुक्यात अनेक शेतकरी, शेतमजूर यांचा दुग्धोत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय आहे. परंतु लम्पी आजाराने अनेकांचे पशुधन दगावले असल्याने दुग्ध उत्पादक अडचणीत आले आहेत. दुग्ध विक्रीतून दररोज होणाऱ्या अर्थार्जनास ब्रेक लागतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला असल्याने दुग्ध उत्पादन व्यवसाय संकटात सापडल्याचे चित्र आहे.

उपचारासाठी पशुपालकांनी तळ ठोकला...
शिरूर अनंतपाळ येथे श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखाना असून, साकोळ, अंकुलगा राणी, येरोळ, हिप्पळगाव, उजेड येथे पशुवैद्यकीय केंद्र आहेत. त्यामुळे परिसरातील पशुपालक लम्पी आजाराने ग्रस्त पशुधन उपचारासाठी दररोज ने-आण करण्यापेक्षा तेथेच तळ ठोकून उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.

पथकाकडून तातडीने उपचार सुरू...
लम्पी आजारास रोखण्यासाठी येथील श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचारासाठी पथक तयार करण्यात आले असून, दवाखान्यात किंवा पशुवैद्यकीय केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या बाधित पशुधनावर तातडीने उपचार करण्यात येत असल्याचे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. गोलेर यांनी सांगितले. दरम्यान, लम्पी आजारास रोखण्यासाठी आवश्यक असणारी लस उपलब्ध नाही. त्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु उपलब्ध गोळ्यांचा वापर करून बाधित पशूंवर उपचार करण्यात येत असल्याचेही डॉ. गोलेर यांनी सांगितले.

Web Title: Lumpy attack on livestock in Shirur Anantapal; So far 665 livestock affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.