लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही!
By हरी मोकाशे | Published: May 24, 2023 05:21 PM2023-05-24T17:21:15+5:302023-05-24T17:22:56+5:30
लातूर जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला.
लातूर : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आतापर्यंत एकूण ५७१ जनावरे दगावली आहेत. या पशुधनाच्या नुकसानीपोटी शासनाने मार्चअखेरपर्यंत जवळपास ४१३ पशुधनाच्या ३६६ पालकांना मदत दिली आहे. त्यानंतर मात्र, नुकसानभरपाई देण्यासंदर्भात शासनाकडून कुठलेही आदेश आले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील १५८ पशूपालक हतबल झाले आहेत. शासन मदतीचा आदेश कधी काढणार असा सवाल व्यक्त होत आहे.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशूपालनाकडे वळावे म्हणून शासन व प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटपही करण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांची संख्या वाढत असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. जिल्ह्यात गत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. राजस्थानहून आलेल्या एका पशुधनामुळे जिल्ह्यात लम्पीचा संसर्ग सुरु झाला. हा रोग प्रामुख्याने गाय आणि बैलांमध्ये दिसून येत आहे. लम्पीचा संसर्ग वाढू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात आला. तसेच जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी, कीटकनाशक फवारण मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे.
३० हजारांपर्यंत आर्थिक मदत...
लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुधन दगावल्यास त्या पशुपालकास शासनाकडून मदत निश्चित करण्यात आली. गाय अथवा म्हशीस ३० हजार, बैलास २५ हजार तर वासरास १६ हजारांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
६ हजार ५८१ जनावरांना प्रादुर्भाव...
जिल्ह्यात गाय वर्गीय पशुधन २ लाख ५५ हजार तर म्हैस वर्गीय पशुधन २ लाख ५७ हजार आहे. जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला. उपचारानंतर ६ हजार १० पशुधन चांगले झाले. मात्र, ५७१ पशुधन दगावले आहेत.
७६ लाखांची मिळाली मदत...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७१ पशुधन दगावले आहेत. मार्चअखेरपर्यंत जवळपास ४१३ पशुधनाच्या नुकसानीपोटी ३६६ पशुपालकांना ७६ लाख २६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत देण्यात आली आहे.
ना आदेश, ना मदत...
मार्च अखेरपर्यंत मृत्यमुखी पडलेल्या पशुधनास मदत देण्यात आली. एप्रिल ते २३ मे या कालावधीत जवळपास १५८ पशुधन दगावले आहेत. त्यांच्या नोंदी पशुसंवर्धन, जिल्हा पशु सर्वचिकित्सालय कार्यालयाकडे करण्यात आल्या. मात्र, शासनाकडून मदतीसंदर्भात कुठलेही आदेश अन् निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे पशुपालक हतबल झाले आहेत.
शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा...
लम्पीमुळे ५७१ पशुधन दगावले असून ३६६ पशुपालकांना ७६ लाख २६ हजारांची मदत देण्यात आली आहे. एप्रिलपासून मयत पशुधनाच्या मदतीसंदर्भात राज्य शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत. शासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. सूर्यकांत नागरगोजे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन.