लातूर जिल्ह्यातील १६ गावांतील १०२ पशुधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव
By हरी मोकाशे | Published: September 12, 2022 06:49 PM2022-09-12T18:49:21+5:302022-09-12T18:49:39+5:30
लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.
लातूर : जिल्ह्यातील दहापैकी पाच तालुक्यांतील १६ गावांतील १०२ पशुधनास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात एकही पशुधन दगावले नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरू नये. प्रतिबंधासाठी ५ किमी त्रिजेच्या परिसरातील पशुधनास लसीकरण करण्यात येत आहे. पशुधनास लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रपरिषदेत साेमवारी केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश केंडे, डॉ. कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले उपस्थित होते. यावेळी सीईओ गोयल म्हणाले, राज्यातील २० जिल्ह्यांत लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. २८ ऑगस्ट रोजी राजस्थानहून आलेल्या एका पशुधनामुळे जिल्ह्यात या रोगाचा संसर्ग झाला असून, गेल्या दोन-तीन दिवसांत बाधित जनावरांची संख्या वाढली आहे. हा रोग म्हशींमध्ये क्वचित प्रमाणात असून, गाय आणि बैलांमध्ये प्रामुख्याने आहे. त्यामुळे ३४ हजार ९८३ गोवंशांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी १३ हजार २२२ लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या तीन बैल वगळता लागण झालेले इतर पशुधन बरे झाले आहेत.
बाहेरून औषधी मागविणाऱ्यांवर कारवाई...
रोगाच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून एक लाख लस पुरवठा करण्यात येणार आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत मोफत उपचार आणि लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालकांनी औषधींची बाहेरून खरेदी करू नये. तरीही जर पशुवैद्यकीय दवाखान्यात बाहेरून औषधी आणण्यास सांगितल्यास, त्याची माहिती द्यावी. औषधी आणण्यास सांगणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे सीईओ गोयल यांनी सांगितले.
सध्या पशुधन खरेदी करणे टाळावे...
लम्पी चर्मरोगाची पशुधनात लक्षणे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. सध्या जनावरांचे बाजार, शर्यती, प्रदर्शने, वाहतुकीवर बंदी आहे. अशा परिस्थितीत पशुधन खरेदी करू नये. तसेच ग्रामपंचायतीमार्फत ११६७ गोठ्यांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. तसेच शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आले आहे, असे सीईओ गोयल यांनी सांगितले.
रोग नियंत्रणासाठी घ्या दक्षता...
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गोठा व परिसर स्वच्छ, हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठू देऊ नये. गोठ्यात व जनावरांवर कीटकनाशक औषधींची फवारणी करावी. नेहमी दूध उकळून प्यावे. जनावरांची वाहतूक करू नये.