अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष, सायबर गुन्हेगारांनी ८० लाखांना फसवले
By राजकुमार जोंधळे | Published: July 27, 2024 06:44 PM2024-07-27T18:44:53+5:302024-07-27T18:48:13+5:30
लातुरात गुन्हा दाखल : ऑनलाइन फसवणूक
लातूर : तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर अधिकचा नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून लातुरातील एकाला तब्बल ७९ लाख ६६ हजार ६५९ रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी किरण जीवनराव बिराजदार (४२, रा. सरस्वती कॉलनी, औसा रोड, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून त्यांना फोन आला. त्या ग्रुपच्या ॲडमिनने शेअर्स खरेदी- विक्री करण्यासाठी एका नावाने ॲपची लिंक पाठविली. या ॲपवर आपली रक्कम भरा, तुम्हाला अधिकाधिक नफा मिळवून देऊ, असे आमिष दाखविले. किरण बिराजदार यांनी त्या अज्ञात ॲडमिन ग्रुप चालकाच्या भूलथापांवर विश्वास ठेवून १३ जून ते ५ जुलै २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने तब्बल ७९ लाख ६६ हजार ६४९ रुपये ऑनलाइन भरणा केला. त्यानंतर यासंदर्भात तक्रारदाराला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत अज्ञात ॲडमिन ग्रुप चालकाची अधिक माहिती घेतली असता यामध्ये ऑनलाइन पद्धतीने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप सागर करीत आहेत.
नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये...
सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे मेसेज, लिंक आणि फेक ॲपला कुठलाही प्रतिसाद देऊ नये, मोबाइलवर येणाऱ्या माहितीची खातरजमा करावी, अधिकचा नफा मिळवून देतो, कर्ज मंजूर झाले आहे, या लिंकवर माहिती भरा, अशी बतावणी केली जाते. या बनावट मेसेज, लिंक, ॲपपासून नागरिकांनी सावध राहावे. - दिलीप सागर, पोलिस निरीक्षक, लातूर