वर्षभरापासून महा-ई- सेवा केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:07+5:302021-09-04T04:25:07+5:30
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात मराठी माध्यमाच्या दोन प्राथमिक आणि माध्यमिकच्या तीन शाळा ...
चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ हे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात मराठी माध्यमाच्या दोन प्राथमिक आणि माध्यमिकच्या तीन शाळा आहेत, तसेच एक महाविद्यालय, उर्दू आणि इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. याशिवाय, गावात दोन बँका, डाक विभागाचे उपकार्यालय, महावितरणचे ३३ केे.व्ही. उपकेंद्र आहे. विविध कामानिमित्ताने गाव व परिसरातील नागरिकांची सतत रेलचेल असते. येथील व परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वी येथे महा-ई- सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शासकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गावातील विद्यार्थी, नागरिकांची सोय होण्यास मदत झाली.
दरम्यान, येथील काही शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर येथील महा-ई -सेवा केंद्र काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वडवळ नागनाथसह परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. कुठलेही प्रमाणपत्र काढण्यासाठी नजीकच्या गावात अथवा चाकूरला जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी सातत्याने मागणी होत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे...
महा- ई- सेवा केंद्रामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नव्हती. मात्र, आता कुठल्याही शासकीय कामासाठी तालुक्यास जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. याशिवाय, एका प्रमाणपत्रासाठी दोन हेलपाटे होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
महा-ई- सेवा केंद्रामुळे पीकविमा भरणे, तहसील कार्यालयातील प्रमाणपत्र काढणे, कुठल्याही शासकीय योजनाचा लाभ घेणे सोईचे झाले होते. मात्र, आता हे केंद्रच बंद असल्याने विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.