महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर पेटविल्या चुली; महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
By हरी मोकाशे | Published: March 6, 2023 06:30 PM2023-03-06T18:30:55+5:302023-03-06T18:31:24+5:30
महागाईच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीने धरणे आंदोलन केले.
लातूर : महाविकास आघाडीच्या वतीने महागाई तसेच बेरोजगारीच्या विरोधात होळी दिवशी शिरुर अनंतपाळ येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच चुली पेटवून केंद्र शासनाच्या धोरणांवर संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा गॅस आदी वस्तूंचे भाव भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांसह महिला, युवकांना महागाई व बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे, असे म्हणत शिरुर अनंतपाळ येथील महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी चुली पेटवून केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध केला.
आंदोलनावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, ठाकरे गटाच्या डॉ. शोभा बेंजरगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, अजित माने, भागवत वंगे, आबासाहेब पाटील, विठ्ठलराव पाटील, चेअरमन.रामकिशन गड्डिमे, नगरसेवक सुधीर लखनगावे, अब्दुल अजीज मुल्ला, संजय बिराजदार, सतीश शिवणे, हरिभाऊ सगरे, संदीप धुमाळे, अशोक कोरे, पंडित लवटे, माधव खरटमोल, आदेश जरीपटके, संतोष शिवणे, मोहसीन सय्यद, अनंत काळे, कृष्णा पवार, जर्नाधन पाटील, अनिल देवंगरे, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश तिवारी, भरत शिंदे, अभिनंदन दुरुगकर, सरोजा गायकवाड, गोविंद श्रीमंगल, माधवराव रायवाडे, व्यंकट कल्ले, गंगाधर शिंदे, सिध्दांत गायकवाड आदींची उपस्थिती होती.
तहसीलदारांना निवेदन...
जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी करावेत. मनरेगाच्या जाचक अटी रद्द करुन रखडलेली कामे तात्काळ सुरु करावीत, तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे रखडलेले काम तात्काळ सुरु करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांना देण्यात आले.