"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 03:23 PM2024-11-06T15:23:31+5:302024-11-06T15:30:55+5:30
लातूरमधल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी दौरे सुरु केले आहेत. बुधवारी लातूरमध्ये राज ठाकरे प्रचारसभेत मराठा आरक्षण, बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकास्त्र डागलं. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनाही लक्ष्य केलं.
लातूरच्या रेणापूरमध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. मागील ४० वर्षापासून राजकारणात संधी मिळालेल्या शरद पवार यांनी बारामती तालुक्यात अनेक उद्योगधंदे आणले. पण उर्वरित महाराष्ट्राचा त्यांनी कधी विचार केला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
"१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर महान संत शरद पवार यांनी जातीचे राजकारण आणलं. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकारण सुरु झालं. राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्याने संपूर्ण राज्याकडे पाहिलं पाहिजे. शरद पवार तीनदा राज्यात मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषी मंत्री झाले. एकदा बारामती तालुक्यात जाऊन पाहा. बारामतीमध्ये जेवढे उद्योग धंदे आले ते मराठवाड्यात आणता आले नसते का. विदर्भात आणता आले नसते. इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते," असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला.
राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
यावेळी मराठा आरक्षण मिळू शकत नाही, सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत असंही राज ठाकरे म्हणाले. यासोबत राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांनाही सवाल केला. "जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा," असं राज ठाकरे म्हणाले.