लातूरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 03:10 PM2018-06-25T15:10:51+5:302018-06-25T15:14:01+5:30
मारेकऱ्यांनी पाठलाग करून कोचिंग क्लास संचालकावर हल्ला केल्याचा संशय
लातूर : शहरातील ‘स्टेप बाय स्टेप’ कोचिंग क्लासचे संचालक अविनाश बाबुराव चव्हाण यांची रविवारी मध्यरात्री मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार उच्चभ्रू वसाहत असलेल्या महसूल कॉलनीतील मुख्य रस्त्यावर घडला. अविनाश चव्हाण (वय ३६) यांनी शिक्षकांची नेमणूक करून स्टेप बाय स्टेप हा कोचिंग क्लास लातूर येथे सुरु केला होता. दरम्यान, रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ते आपल्या साईधाम येथील घराकडे कारने एकटेच निघाले होते. अगदी घराच्या जवळ महसूल कॉलनीतील शाळेजवळ रस्त्यावरच अज्ञात मारेक-यांनी त्यांना गाठले व दोन गोळ्या झाडल्या. पहिला वार निकामी गेला. मात्र दुसरी गोळी अविनाश चव्हाण यांच्या छातीत घुसली. त्यात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़शिवाजी राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, उपाधीक्षक गणेश किंद्रे्र, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला़ त्यानंतर अविनाश चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. कोचिंग क्लास चालविणा-या संचालकाचा गोळ्या झाडून खून झाल्याचे वृत्त जिल्हाभरात वा-यासारखे पसरले़ दक्षता म्हणून उद्योग भवन परिसर, सर्वोपचार रुग्णालय येथे मोठा बंदोबस्त तैनात केला आहे़ तसेच खबरदारी म्हणून सोमवार व मंगळवारी खासगी क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.
प्रदीर्घ कालावधी झालेल्या मालू बंधू हत्या प्रकरणानंतर गोळी घालून केलेल्या खुनाचा थरार लातूरकरांसाठी धक्कादायक ठरला़ शैक्षणिकदृष्ट्या प्रगत व शांत शहर अशी ओळख असलेल्या लातूर शहरामध्ये रविवारी मध्यरात्री घडलेली घटना चर्चेची ठरली़
अविनाश चव्हाण यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात पहाटेच्या वेळी आणला़ तिथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती़ दुपारी उशिरापर्यंत आरोपींना अटक करा, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती़ त्यामुळे गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व राखीव दलाची एक तुकडीही बंदोबस्ताला होती.
पाठलाग करून झाडल्या गोळ्या
पोलिसांच्या अंदाजानुसार अविनाश चव्हाण यांचा मारेकºयांनी मोटारसायकलवरून पाठलाग केला असावा़ हे मारेकरी त्यांच्या मार्गावर नजर ठेवून असावेत. सरस्वती कॉलनीतील महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने संपल्यानंतर जिथे रिकामे प्लॉट आहेत तिथेच हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.
सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी
अविनाश चव्हाण यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहेत़ सर्वसामान्य कुटुंबातील चव्हाण यांनी उद्योग भवन परिसरात स्टेप बाय स्टेप नावाने ११ वी तसेच १२ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरु केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले तसेच विवाहित बहीण असा परिवार आहे.
तपासासाठी पाच पथके
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़राठोड म्हणाले, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत़ आम्ही हल्लेखोरांना लवकरच गजाआड करू़ दरम्यान, अशोक गंगाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे़ सदर फिर्यादीच्या जबाबात तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे़ या संदर्भात उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव म्हणाले, कुटुंबियांच्या संशयानुसार संबंधितांची चौकशी केली जाईल, त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल़ तसेच या घटनेचे अन्य काही धागेदोरेही शोधले जात आहेत़