शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:04 PM2017-11-17T21:04:43+5:302017-11-17T21:04:59+5:30

आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.

Maharashtra will reach first place in education - Vinod Tawde | शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

शिक्षणामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकवर पोहोचेल- विनोद तावडे

Next

लातूर : प्रत्येक मूल शाळेत यावे, शिकावे या उद्देशाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'शिक्षणाच्या वारीचे ' हे तिसरे वर्ष असून या आगळ्यावेगळ्या वारीमुळे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले.

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षणाच्या वारीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. लातूर शहरातील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स या ठिकाणी १७ ते १९ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत शिक्षणाची वारी संपन्न होत आहे. लातूर या वारीचे उद्घाटन शिक्षण आयुक्त डॉ. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, विद्या प्राधिकरण, पुणेचे संचालक डॉ. सुनील मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून रंगविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला प्रथम स्थानांवर नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शिक्षक प्रगत झाला तरच शाळा प्रगत होऊ शकते व हे दोन्ही प्रगत झाले तरच विद्यार्थी प्रगत होऊ शकतात. विद्यार्थी प्रगत झाल्यास आदर्श नागरिक घडवणे सुलभ होऊ शकते. यावेळी आ. विक्रम काळे, खा. डॉ. सुनील गायकवाड इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली.
विनोद तावडेंनी केले भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना मार्गदर्शन
शिक्षणाच्या वारीचे संकल्पक, शालेय व उच्च-तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे मुंबईत अचानक महत्वाची बैठक लागल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. एक शिक्षणप्रेमी व वाचकप्रेमी नेतृत्व अशी ओळख निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरलेल्या विनोद तावडे यांनी लातूरमध्ये संपन्न होत असलेल्या या शिक्षणाच्या वारीला थेट भ्रमणध्वनीवरून संबोधित केले.

ते म्हणाले की, लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या लातुरात पहिल्यांदाच ही वारी संपन्न होत आहे. आपल्या सरकारच्या या उपक्रमांमुळे शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र १६ व्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. हे यश अर्थातच या वारीच्या माध्यमातून शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे आहे. या वारीच्या माध्यमातून ज्या - ज्या शिक्षकांनी चांगली संकल्पना, प्रयोग केला आहे, त्याचा मोबाईल ॲप तयार केला जावा. राज्याच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा उपयोग अवघ्या देशाला व्हावा, यासाठीही आपण प्रयत्न करू. शिक्षकांना ऑनलाइनच्या कामातून आठ दिवसांत कमी करू, असे तावडे यांनी सांगितले. शिक्षणाच्या वारीच्या माध्यमातून राज्य लवकरच शिक्षणाच्या क्षेत्रात प्रथम स्थानावर पोहचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त व्यक्त केला

Web Title: Maharashtra will reach first place in education - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.