दाेन हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; ACBच्या पथकाची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Published: May 18, 2024 10:11 PM2024-05-18T22:11:29+5:302024-05-18T22:11:59+5:30

कृषिपंपासाठी नवीन वीजजाेडणी देण्याच्या कामासाठी मागितली होती लाच

Mahavitaran's technician in the net while accepting a bribe of 2000; Action by ACB team | दाेन हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; ACBच्या पथकाची कारवाई

दाेन हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; ACBच्या पथकाची कारवाई

राजकुमार जाेंधळे, लातूर: कृषिपंपासाठी नवीन वीजजाेडणी देण्याच्या कामासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करून तडजाेडीअंती दाेन हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई औसा येथे तुळजापूर टी-पाॅइंटवर एसीबीच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा शिवारात तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर शेती आहे. कृषिपंपासाठी नवीन वीजजाेडणी देण्यासाठी ३९ वर्षीय तक्रारदाराने अर्ज केला हाेता. दरम्यान, महावितरण कार्यालय, शाखा बेलकुंड येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सतीश उत्तमराव कांबळे (वय ३८, रा. हंगरगा, ता. निलंगा) याने वीजजाेडणीच्या कामासाठी १ डिसेंबर २०२३ राेजी १३ हजार आणि ६ डिसेंबर २०२३ रोजी दाेन हजार असे एकूण १५ हजार फोन-पेवर तक्रारदाराकडून स्वीकारले. यासाठी तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला, तरीही काम झाले नाही. अखेर शुक्रवार, १७ मे राेजी तक्रारदाराने प्रलंबित कामाबाबत फोनवर संपर्क करून विचारणा केली. यावेळी सतीश कांबळे याने तीन हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारीची पडताळणी करून, लातूर येथील एसीबीच्या पथकाने शनिवार, १८ मे रोजी औसा येथे तुळजापूर टी-पाॅइंटवर सापळा लावला. तडजोडीअंती दाेन हजारांची लाच स्वीकारताना तंत्रज्ञ सतीश कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबीचे पाेलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथील उपअधीक्षक संतोष बर्गे, पाेलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, पाेलिस निरीक्षक अन्वर मुजावर, फारुक दामटे, भीमराव आलुरे, शाम गिरी, शिवशंकर कच्छवे, संदीप जाधव, मंगेश काेंडरे, दीपक कलवले, गजानन जाधव, संताेष क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

Web Title: Mahavitaran's technician in the net while accepting a bribe of 2000; Action by ACB team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.